राजमातेश्वरी कंकालकारो देवीची पारंपरिक पद्धतीने पुजाअर्चा करून प्राणप्रतिष्ठा

आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन

कोरची : तालुक्यातील समस्त नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुमकोट येथील 60 गावची देवी राजमाता राजेश्वरी देवीची प्राणप्रतिष्ठापणा सोहळा आणि नवीन मंदिराचा उद्घाटन कार्यक्रम कुमकोट येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार कृष्णा गजबे, तर अध्यक्षस्थानी कुमकोट येथील राजवैद्य राजीमसाय कल्लो होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष नसरुद्दीन भामानी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सियाराम हलामी, कोरची गोंड समाजाचे अध्यक्ष रामसुराम काटेंगे, प्राचार्य देवराव गजभिये, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद चौबे, नगरसेवक घनश्याम अग्रवाल, गोविंद दरवडे, तहसीलदार प्रशांत गड्डम, संवर्ग विकास अधिकारी राजेश फाये, सातपुतीचे सरपंच अनिता नुरुटी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कुमकोट येथील देवस्थान संपूर्ण तालुक्याचे श्रद्धास्थान असून त्याचा जिर्णोद्धार व्हावा याकरिता कार्यकर्ते नेहमी आग्रही असायचे. याकरिता मी सुद्धा सतत पाठपुरावा करून कुमकोट येथील मंदिराला क वर्गाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. कुमकोट येथे भविष्यातही विकासात्मक कामे अशाच प्रकारे आणून मंदिर परिसराचा जिर्णोद्धार करू. आज या देवस्थानचे उद्घाटन माझे हस्ते झाले. मी याला आपले भाग्यच समजतो, असे उद्गार यावेळी आमदार गजबे यांनी आपल्या भाषणात काढले.

यावेळी आयोजकांनी आमदार कृष्णा गजबे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच सदर कार्यक्रमांमध्ये आलेल्या गावपुजाऱ्यांचा आमदार गजबे यांनी दुपट्टा घालून सत्कार केला. तालुक्यातील विविध भागांमधून आलेल्या भाविकांची जेवणाची व्यवस्था सुद्धा यावेळी करण्यात आली होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष सदाराम नुरुटी, सीताराम होळी, राजेश होळी, फत्तेसाय होळी, सुरेश काटेंगे, मंसाराम बोगा, लोकेश कल्लो, सुरेश होळी, संदीप होळी, वादुराम नुरुटी, सामसाय होळी, दामेसाय गोटा आदींनी परिश्रम घेतले.