गडचिरोली : पेट्रोलसारख्या अतिज्वलनशिल पदार्थाचा साठा असणाऱ्या पेट्रोल-डिझेल पंपाजवळ आगीसारखी घटना सहसा घडत नाही. घडलीच तर ती तत्काळ विझविण्याची सोय पेट्रोल पंपावर असावी लागते, नव्हे ती असतेच. पण रविवारी गडचिरोली-आरमोरी मार्गावरील वसा गावाजळच्या पेट्रोल पंपाजवळ चक्क एक ट्रक धगधगत जळत होता. पण त्या ट्रकला लागलेली आग विझविण्यासाठी तातडीने अग्निशमन व्यवस्था उपलब्ध झाली नाही. त्यामुळे त्या पंपावरील कर्मचाऱ्यांसह रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांचाही जीव टांगणीला लागला होता.
वसा येथील सद्गुरू पेट्रोल पंपावर रविवारी एक ट्रक उभा होता. इंजिन गरम झाल्याचे लक्षात आल्याने चालक आणि क्लिनर ट्रकच्या खाली उतरले आणि थोड्याच वेळात ट्रकने पेट घेतला. यामुळे पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी चांगलीच धावपळ झाली. त्यांनी ट्रकला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे वसा येथील हा पेट्रोल पंप गडचिरोली शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र ट्रकची आग विझवण्यास गडचिरोलीवरून अग्निशमन गाडी पोहोचू शकली नाही. दरम्यान तशाही अवस्थेत रस्त्यावरून येणे-जाणे करणारी वाहने सुरूच होती. ट्रकमधील डिझेल टाकीचा स्फोट झाला असता तर पेट्रोल पंपासह रस्त्याने जाणाऱ्या वाहनांनाही मोठा धोका निर्माण झाला असता.