गडचिरोलीत क्रिकेट अकादमी सुरू करा, आम्ही मार्गदर्शन करू

व्हीसीएचे सचिव बडकस यांची माहिती

गडचिरोली : विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर यांच्या वतीने गडचिरोलीत आयोजित व्हीसीए टी-20 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा स्टेडीअमवर करण्यात आले. गडचिरोलीसारख्या उपेक्षित जिल्ह्यात कुणीतरी पुढाकाराने क्रिकेट अकॅडमी सुरू करावी, त्यांना आम्ही मार्गदर्शन करू, जेणेकरून भविष्यामध्ये गडचिरोलीसारख्या ठिकाणी अनेक गुणवंत खेडाळू तयार होऊन मोठ्या स्पर्धेमध्ये खेळू शकतील, असे मत यावेळी विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय बडकस यांनी व्यक्त केले.

गडचिरोलीसारख्या शहरात क्रिकेट अकॅडमी सुरू झाल्यास होतकरू खेळाडूंना तिथे स्थान दिल्या जाईल. क्रिकेट या खेळाचे ज्ञान घेऊन त्यांना क्रिकेटमध्ये आपलं नाव करण्यास वाव मिळेल, असेही ते याप्रसंगी म्हणाले. पण हे सर्व करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

गडचिरोलीत 30 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेतूनच गुणवंत खेळाडूंचा विदर्भ क्रिकेट संघ निवडला जाणार आहे.

क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला मैदान व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे कुणाल गनरकर, मंगेश देशमुख, आशिष ब्राह्मणवाडे, सचिन मडावी, प्रशांत भुपाल, अजय बर्लावार, प्रणय न्यालेवार यांच्यासह अनेक मान्यवर तथा स्पर्धेतील सहभागी खेळाडू हजर होते. उद्घाटनीय सामन्यात गडचिरोली संघाने नागपूर संघावर अवघ्या 4 धावांनी मात केली.