जनजागृती रॅलीतून आरोग्य विभागाचे गडचिरोलीकरांना मतदानाचे आवाहन

आशा, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

गडचिरोली : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी संजय दैने आणि सीईओ आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.

बुधवारी (दि.13) इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रुग्णालयात जिल्हा शक्य चिकित्सक डॅा.माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा.अविनाश टेकाडे तसेच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी मतदान प्रतिज्ञाही घेण्यात आली.

मतदान करणे हा सर्वांचा मुलभूत हक्क असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, तसेच इतरांनासुध्दा मतदान करण्याकरीता प्रवृत्त करावे, असे आवाहन यावेळी डॉ.प्रताप शिंदे यांनी केले.

या रॅलीमध्ये आरोग्य विभागातील सर्व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गडचिरोली क्षेत्रातील सर्व आशा स्वयंसेविका, शासकिय नर्सिंग स्कुल गडचिरोली तथा श्री साई इंस्टीट्युट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्स वाकडी येथील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. मतदान जनजागृतीकरीता जिल्हा परिषद येथे हस्ताक्षर अभियानही राबविण्यात आले.