महाराष्ट्राचे शक्तीकेंद्र गेले गुजरातला, ही निवडणूक आत्मसन्मानाची लढाई

कन्हैयाकुमारसह ना.वडेट्टीवार बरसले

आरमोरी : महाराष्ट्राला थोर संतांचा, वीरांचा वारसा लाभला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा दोन पक्ष फोडून सरकार बनवण्यात आले. महाराष्ट्राचे शक्तीकेंद्र गुजरातच्या व्यापाऱ्याच्या हातात गेले. महाराष्ट्रातील प्रकल्प, जमिनी गुजरातच्या व्यापाऱ्याच्या घशात घालण्यात आल्या. महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का लागला आहे. त्यामुळे ही निवडणूक स्वाभिमान परत मिळवण्यासाठी आहे, अशी टीका काँग्रेसचे स्टार प्रचारक कन्हैय्या कुमार यांनी आरमोरी येथील प्रचारसभेत केली. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व गुजरातच्या चरणी महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवणाऱ्यांना धडा शिकवा, असा प्रहार यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

भाजपवाले हे धर्मयुद्ध असल्याचे सांगून दिशाभूल करीत आहे. हे धर्मयुद्ध असेल तर आम्ही पण सोबत आहोत. पण हे युद्ध रोजगारासाठी, शेतकऱ्यांसाठी लढणार का, असा सवाल कन्हैया कुमार यांनी उपस्थित केला. येथील 80 कोटी जनता आजही पाच किलो मोफत धान्याच्या रांगेत उभी आहे. उद्योग पळविणाऱ्या, तरुणांच्या हातून काम हिरावणाऱ्या महायुतीला सत्तेतून बेदखल करा, असे आवाहन त्यांनी केले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर म्हणाले, महाराष्ट्रातील लुटारू, असंवैधानिक, खोकेबाज सरकारने जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. महाविकास आघाडी ही राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. खासदार डॅा.किरसान यांनी लोकसभेत ज्या मताधिक्याने मला निवडून दिले तीच एकजुट आताही दाखविण्याचे आवाहन केले.