गडचिरोली : नक्षलदृष्ट्या संवेदनशिल असल्याने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांसाठी मतदानाची वेळ दुपारी ३ वाजेपर्यंतच होती. त्यामुळे सकाळपासून जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाल्याचे दिसत होते. विशेष म्हणजे दुपारी ३ वाजता मतदान केंद्रांचे बाहेरील फाटक बंद करण्यात आल्यानंतरही केंद्राच्या आवारात मतदारांच्या रांगा कायम होत्या. जवळपास सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांचे मतदान चालले. या गर्दीमुळे मतदारांना उकाड्याचा त्रास होत असला तरी त्यांचा उत्साह कायम होता. ही स्थिती गडचिरोली शहरासह ग्रामीण भागातही कायम होती.
मतदानासाठी अनेक नागरिकांनी पायी चालत येऊन मतदान केंद्र गाठले. मतदान केंद्रांवर झालेल्या गर्दीमुळे बराच वेळपर्यंत मतदारांना भर उन्हात रांगेत ताटकळत राहावे लागले. विकासाची आस ठेवून मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी सरसावणाऱ्या या नागरिकांमुळे मतदानाची टक्केवारी प्रत्येक निवडणुकीत जास्त राहते. यावेळीही गडचिरोली जिल्ह्याचे मतदान इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अव्वल राहील अशी आशा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी व्यक्त केली.
कुरखेडा-सिरोंचात मतदान यंत्र पडले बंद
कुरखेडा येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाल्याने दिड तास मतदान खोळंबले होते. ग्रामीण विकास उच्च प्राथमिक शाळेतील केंद्रावर ईव्हीएम काम करत नसल्याने स्ट्राँग रूममधून दुसरे मतदान यंत्र आणून लावण्यात आले. या प्रक्रियेत दिड तास मतदान खोळंबून असल्याने मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. नक्षलग्रस्त भागातील हे केंद्र असल्यामुळे केंद्रावर अतिरिक्त मतदान यंत्र ठेवले जात नाही. स्ट्राँग रूममधून आणून ते लावावे लागल्यामुळे थोड विलंब झाल्याचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरच्या सिरोंचा येथे तीन मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने मतदान खोळंबले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अहेरी येथे ठेवलेले पोलिस दलाचे हेलिकॅाप्टर तातडीने उपलब्ध करून देऊन सिरोंचा येथे ईव्हीएम पोहोचविण्यास मदत केली.