पोटगाव येथे अखंड दिव्य ज्योती कलश यात्रेचे उत्साहात स्वागत

मा.आ.गजबे यांची सपत्निक उपस्थिती

देसाईगंज : अखिल भारतीय गायत्री परिवाराच्या वतीने काढण्यात आलेली देशव्यापी अखंड दिव्य ज्योती कलश यात्रा देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथे पोहोचली. यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी सपत्निक अखंड ज्योतीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. संपूर्ण गावकऱ्यांनी या यात्रेचे उत्साहात स्वागत केले. यावेळी गावातील हनुमान मंदिराच्या प्रांगणात दीपप्रज्वलन करून आरती करण्यात आली.

अखंड ज्योतीची शताब्दी आणि माताजींच्या दिव्य अवताराच्या स्मरणार्थ गायत्री परिवारातर्फे देशभरात दिव्य ज्योती कलश यात्रा काढण्यात येत आहे. सामूहिक ध्यान आणि महान संस्कारांच्या माध्यमातून सक्षम, समृद्ध आणि सुसंस्कृत भारताची पुनर्बांधणी करणे हा या यात्रेचा उद्देश आहे. ही अखंड दिव्य ज्योती कलश यात्रा देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांना भेटी देणार आहे.

अखंड दिव्य ज्योती कलश यात्रेच्या माध्यमातून गायत्री परिवाराने समाजात अध्यात्मिक आणि सांस्कृतिक जागृती करण्यासाठी महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे, अशी भावना यावेळी बोलताना माजी आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केली.