कळपापासून दूर गेलेल्या रानटी हत्तीने मारला चांभार्डा गावात फेरफटका

नागरिकांची तारांबळ, हाणी नाही

गडचिरोली : रानटी हत्तींच्या कळपाचा चुरचुरा-दिभना परिसरातील शेतशिवारात वावर असला तरी या कळपापासून दूर भरकटत असलेल्या टस्करने (सुळे असलेला नर हत्ती) सोमवारी संध्याकाळी चक्क चांभार्डा टोली या गावात एंट्री केली. जेमतेम 6.30 वाजताच्या सुमारास तो गावात आल्याचे पाहून नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सर्वांची पळापळ सुरू झाली. पण गावातील रस्त्याने फेरफटका मारल्यानंतर त्याने पुन्हा जंगलाचा रस्ता पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हा टस्कर हत्ती अनेक दिवसांपासून कळपापासून दूर राहात आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यातही फेरफटका मारला होता. आता तो पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात आला असून कळपापासून अवघ्या काही किलोमीटरवर आहे.

टस्कर हत्ती आणि कळपाचा सध्या आरमोरी आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वावर आहे. शेतातील धानपीकावर हे हत्ती चांगलाच ताव मारत आहेत. त्यांच्या हालचालींवर वनविभागाच्या टिमचे लक्ष आहे.