गडचिरोली : काही दिवसांपासून आरमोरी तालुक्यात डेरेदाखल असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाची दोन दिवसांपासून गडचिरोली तालुक्यात भ्रमंती सुरू आहे. रविवारी संध्याकाळी त्यांनी वाकडी जवळून गडचिरोली-चामोर्शी हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून मुडझाकडे प्रवेश केला. सोमवारी संध्याकाळी हे हत्ती वैनगंगा नदीजवळच्या पुलखल भागात पोहोचले होते. दरम्यान पहाटेपर्यंत हत्तींनी कनेरीजवळ वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला आहे.
या हत्तींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यासह वनविभाग, हुल्ला टिम, रॅपिड रिस्पॅान्स टिमकडून देखरेख सुरू आहे. आधी 22 ते 23 च्या संख्येत असलेल्या या हत्तींच्या या कळपातील सदस्यांची संख्या आता 27 ते 28 वर पोहोचली आहे. त्यात काही पिलूही आहेत.
असा घातला शहराला वळसा
हे हत्ती आरमोरी तालुक्यातून दोन दिवसांपूर्वी गडचिरोली तालुक्यात आले. शहराच्या पूर्वेकडून खरपुंडी, वाकडी, मुडझा असा शहराला वळसा घालत रविवारी संध्याकाळी ते पुलखल भागात पोहोचले. जवळच वैनगंगा नदी असल्यामुळे ते नदी पार करून चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत जाण्याची शक्यता होती. त्यामुळे वनविभागाच्या पथकासह सर्व टिम हत्तींच्या हालचालींवर नजर ठेवून होती. नदीच्या प्रवाहाला वेग असल्याने हे हत्ती नदी पार करतील किंवा नाही याबद्दल गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांनी साशंकता व्यक्त केली होती. मात्र मध्यरात्रीनंतर हत्तींनी नदी पार केली. मात्र ते पुन्हा माघारी फिरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आमचे त्यांच्या हालचालींवर पूर्ण लक्ष आहे, असे गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांनी सांगितले.
सध्या नागरिकांनी शेतात जाऊ नये
रविवारी संध्याकाळी हत्तींच्या कळपाने वाकडीजवळील जंगलातून गडचिरोली-चामोर्शी मार्ग ओलांडला. यावेळी अनेक वाहनधारकांची तारांबळ उडाली. बराच वेळ या मार्गावरील वाहतूकही खोळंबली होती. शेतातील बहरलेले धानाचे पीक हत्तींना आकर्षित करत आहे. परंतू सध्या हत्तींचा वावर ज्या भागात आहे त्या भागात शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळावे. हत्ती निघून जाताच त्यांनी केलेल्या पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, असे उपवनसंरक्षक शर्मा यांनी सांगितले.