दहशतीखालील वाकडीच्या नागरिकांना माजी खा.अशोक नेते यांनी दिला धीर

उपाययोजनांसाठी मुख्य वनसंरक्षकांना सूचना

गडचिरोली : शहरापासून जवळच असलेल्या चामोर्शी मार्गावरील सेमाना, वाकडी गावाच्या परिसरात रानटी हतींच्या कळपाने दस्तक दिल्याने आणि हत्तींचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वाकडी गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जनजाती मोर्चा) अशोक नेते यांनी सोमवारी वाकडीच्या ग्रामपंचायत कार्यालयात यासंदर्भात आढावा घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.

रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. नागरिकांमध्ये असलेली हत्तींची दहशत आणि हत्तींना या भागातून हुसकावून लावण्याबाबत असलेली जनभावना पाहून अशोक नेते यांनी त्यांना धीर दिला. यावेळी मुख्य वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांच्याशी त्यांनी मोबाईलवरून चर्चा करत योग्य त्या उपाययोजना करत नागरिकांचे नुकसान होणार नाही याची योग्य खबरदारी घेण्याची सूचना नेते यांनी केली. बैठकीत ग्रामस्थांसोबत चर्चा करताना नेते यांनी नागरिकांनी सतर्क राहण्यासोबत कोणीही एकांतात आणि एकट्याने जंगलाच्या दिशेने, शेतात जाऊ नये अशी सूचना केली.

यावेळी प्रामुख्याने भाजपचे तालुका महामंत्री बंडू झाडे, जेष्ठ नेते यशवंत झरकर, देविदास नागरे, चरणदास पा.बोरकुटे, दिवाकर चौधरी, देवराव पाल यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील महिला, पुरूष उपस्थित होते.