गडचिरोली : जिल्ह्यात वाघ आणि हत्तींच्या हल्ल्यात बळी पडण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी गडचिरोलीपासून अवघ्या तीन ते चार किलोमीटरवर असलेल्या वाकडीच्या जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केले.
वाकडी येथील मंगलाबाई विठ्ठल बोळे (५५ वर्ष) ही महिला गावालगतच्या जंगलात सरपण आणण्यासाठी गेली होती. सोबत तिची मुलगी शितल तिक्षण रोहनकर आणि गावातील इतर काही महिलाही होत्या. मंगलाबाई खाली वाकून जंगलातील वाळलेल्या काड्या वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने झुडपातून तिच्यावर हल्ला केला.
मंगलाबाईच्या ओरडण्याच्या आवाजाने जवळच असलेली तिची मुलगी आणि इतर महिला आवाजाच्या दिशेने धावल्या. त्यांनी आरडाओरड करत वाघाच्या तावडीतून मंगलाबाईला सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मंगलाबाईला तिथेच सोडून वाघ तर पळून गेला, पण गळ्याजवळ झालेल्या खोल जखमेतून अतिरक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.