‘आव्हान’मध्ये प्रशिक्षित साहसी विद्यार्थी समाजाला उपयोगी ठरतील-ना.वडेट्टीवार

आपत्ती व्यवस्थापन शिबिराचा समारोप

गडचिरोली : नैसर्गिक आपत्ती कधी येईल हे सांगता येत नाही. अशावेळी संकटात सापडलेल्या माणसाला वेळीच मदत करणे गरजेचे असते. त्यासाठी विद्यापीठाच्या वतीने आयोजित हे प्रशिक्षण शिबिर महत्वाचे ठरते. त्याचे चांगले नियोजन करून गोंडवाना विद्यापीठाने राज्यातून आलेल्या तरुण विद्यार्थ्यांच्या मनात गडचिरोलीबद्दल असलेला गैरसमजही दूर करण्याचे काम केले याचा आनंद आहे, अशी भावना विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी गडचिरोलीत व्यक्त केली.

गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकाराने गडचिरोलीत आयोजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर ‘आव्हान २०२३’च्या समारोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ना.वडेट्टीवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे होते. यावेळी प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, एनडीआरएफ पथक पुणेचे असिस्टंट कमांडन्ट निखिल मुधोळकर, राजभवनच्या निरीक्षण समितीचे सदस्य डॉ.नितीनप्रभू तेंडूलकर, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.चंद्रमौली, वित्त व लेखाअधिकारी भास्कर पठारे, गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक तथा आव्हान २०२३ चे समन्वयक डॉ.श्याम खंडारे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विवेक गोर्लावार, नंदा सातपुते, रंजना लाड, विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ.दिनेश नरोटे आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

यावेळी कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांनी अध्यक्षीय समारोप करताना, आव्हान शिबिरापासून विद्यार्थ्यांनी मी माझ्या समाजातील लोकांना आपत्तीपासून वाचवले पाहिजे. समाजातील लोकांच्या कामी मला कसे येता येईल, असा बोध घेतला पाहिजे. गडचिरोली जिल्हा पुन्हा पुन्हा अनेक कार्यक्रमांसाठी आपल्याला आवाज देत राहील, आपण त्याला साद घालत राहा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी विविध विद्यापीठांचे संघ व्यवस्थापक, रासेयोचे अधिकारी तसेच १० दिवसीय शिबिरात उत्कृष्ट स्वयंसेवक, उत्कृष्ट विद्यापीठ संघ यांचा ट्रॅाफी देऊन ना.वडेट्टीवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच गोंडवाना रेडिओ या नव्या इंटरनेट रेडीओचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

आभार कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी तर संचालन प्रा.डॉ.नीलकंठ नरवाडे यांनी केले. आव्हान शिबिरासाठी समन्वयक प्रा.डॉ.प्रिया गेडाम यांच्यासह सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.