गडचिरोली : गडचिरोलीचा रहिवासी आणि सध्या पुणे येथे उच्च शिक्षण घेत असलेल्या यशराज धर्मदास सोमनानी याने तिसऱ्या स्क्वे मार्शल आर्ट नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कौशल्य या प्रकारात सुवर्णपदक पटकावले. धुळे-पिंपळनेर येथे चार दिवस ही स्पर्धा चालली.
स्क्वे मार्शल आर्ट फेडरेशन इंडियाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत एकुण 20 राज्यांनी सहभाग घेतला. त्यात महाराष्ट्र, गोवा, केरळ, तमिळनाडू, आसाम, मध्यप्रदेश, अंदमान आणि निकोबार, राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नागालँड, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, झारखंड, कर्नाटक या राज्यांतील 600 वर खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत पुण्यातील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी यशराज याने कौशल्य या प्रकारात महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत सुवर्णपदक पटकावले. यशराजने आपल्या यशाचे श्रेय आई माधुरी सोमनानी, वडील धर्मदास सोमनानी, तसेच प्रशिक्षक व स्क्वे फेडरेशन इंडियांच्या कोअर कमिटीचे मेंबर संदीप पेदापल्ली यांना दिले.
या सुवर्ण कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्रा.आर.एन.पाटील, ए.बी.वाणी व इतर शिक्षकवृंदांनी यशराजचे कौतुक केले.