गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली व जिल्हा क्रीडा परिषद, तसेच नेहरु युवा केंद्र तथा एनएसएस गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि.30 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतिक भवन, गडचिरोली येथे सकाळी 9 वाजतापासून हा महोत्सव सुरू होणार आहे.
युवकांचा सर्वांगिन विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे याकरीता या युवा महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते. जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर असे युवा महोत्सवाचे टप्पे आहेत. यावर्षीचा युवा महोत्सव “विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना” या संकल्पनेवर आधारित राहणार आहे. विविध कलाप्रकारानुसार युवकांच्या स्पर्धा त्यात राहणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समुह लोकनृत्य, लोकगीत, कौशल्य विकासामध्ये कथा लेखन, चित्रकला स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), कविता, युथ आयकॉन व ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय युवा महोत्सव – विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग याअंतर्गत विकसित भारतासाठी तंत्रज्ञान, विकासही-विरासतही, विकासित भारतासाठी युवकांची तयारी, भारताला विश्वगुरू बनवताना, भारताला स्टार्टअपची राजधानी बनवताना, फिट इंडिया, उर्जावान भारत, भविष्यातील इमारती आणि बांधकामे, सामाजिक संकेत महिलांचा विकास अशा विविध विषयांवर ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा होणार आहे. विकसित भारत पीपीटी आव्हान या विषयावर निबंध स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी माय भारत पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
जिल्हास्तरावर स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणारे युवक-युवती किंवा संघ विभागस्तरावर सहभागी होतील. युवा महोत्सवामध्ये सहभागी युवक-युवतींचे वय 15 ते 29 या वयोगटातील असावे. सहभागी होणारे युवक युवती हे गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असणे गरजेचे राहील. जिल्हास्तरावर सहभागी स्पर्धकांना यावर्षीपासून प्रथम, द्वितीय व तृतीय प्राविण्य प्राप्त करणाऱ्या वैयक्तिक / सांघिक कलाप्रकारानुसार रोख बक्षिसे कार्यालयाच्या वतीने देण्यात येतील.
जिल्ह्यातील विविध युवक युवतींनी मोठ्या संख्येने महोत्सवात सहभागी होण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे दि.29 नोव्हेंबरपर्यंत सहभागी व्हावे. त्यासाठी ई-मेल आयडी dsogad2@gmail.com वर प्रवेश नोंदवावा. अधिक माहितीकरीता एस.बी.बडकेलवार यांच्याशी प्रत्यक्ष किंवा दुरध्वनी क्रमांक 9503331133 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.