गडचिरोली : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.21) जिल्ह्यात ठिकठिकाणी सामुहिक योगाभ्यासाचे आयोजन केले होते. जिल्हा प्रशासन, गोंडवाना विद्यापीठ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासह लॅायड्स मेटल्सच्या वतीने सुरजागडजवळील हेडरी येथील निसर्गरम्य वातावरणात योगासने करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी यात सहभाग घेतला. याशिवाय सीआरपीएफचे जवान, नर्सिंगच्या विद्यार्थिनींसह माजी खासदार अशोक नेते यांनीही योगासनांचा आनंद घेतला.
दैनंदिन योगा हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली – कुलगुरु डॉ.बोकारे
जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योग हे प्राचीन शास्त्र असून या शास्त्राने केवळ आपली अमूल्य परंपरा समृद्ध केली नाही तर या शास्त्राच्या साधकांचे जीवन समृद्ध केले आहे. निरोगी शरीर व स्वस्थ मनासाठी योगासने आवश्यक असून दैनंदिन योगा हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांच्यासह प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, वित्त व लेखा अधिकारी भास्कर पठारे, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ.अनिता लोखंडे, नेहरु युवा केंद्राचे युवा अधिकारी अमित पुंडे, आर्ट ऑफ लिव्हींगचे योग प्रशिक्षक मिलींद उमरे, अंजली कुळमेथे, पतंजली योग समितीच्या माधुरी दहीकर आदी उपस्थित होते.
लॉयड्स मेटल्सच्या कार्यक्रमात 1200 लोकांचा सहभाग
लॉयड्स मेटल अँड लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन, लोह खनिज खाण सुरजागडच्या वतीने हेडरी येथील निसर्गरम्य वातावरणात योगा दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन के.सत्या राव, साई कुमार, अरुण रावत, शेट्टी, राजा आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षक संगीता यांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित 1200 पेक्षा जास्त सहभागी नागरिकांना योगाभ्यासाचे धडे दिले.
या कार्यक्रमासाठी नागरिकांना पोहचण्यासाठी कंपनीतर्फे बस सेवा पुरविण्यात आली होती. तसेच सहभागी झालेल्या सर्व लोकांसाठी नाष्टा-पाण्याची सोय केली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांनी आयोजक लॉयड्स मेटल अँड लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनचे आभार मानले. शेवटी योगा प्रशिक्षक संगीता, सहाय्यक प्रशिक्षक अरविंद यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन, लोह खनिज खाण सुरजागडच्या चमुने भरपूर मेहनत घेतली.
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग आवश्यक- अशोक नेते
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मनुष्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवणे कठीण जाते. पण योगासारखा व्यायामाच्या प्रकाराने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही आपल्याला सुदृढ राहता येते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय योगाचे महत्व जगाला सांगून 21 जून या दिवसाला जागतिक योग दिन म्हणून मान्यता मिळवून दिली. आपणही नियमित योगा करत त्याचे महत्व समजून घेतले पाहिजे, अशी भावना व्यक्त करत माजी खासदार अशोक नेते यांनी जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मा.खा.नेते यांनी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून स्वत: योगासने केली. तसेच गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी आणि भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही नियमित योगासने करण्याचे आवाहन त्यांनी केले.
योग म्हणजे भारताने जगाला दिलेली आरोग्य संजीवनी- डॉ.साळवे
डॉ.साळवे नर्सिंग कॉलेज गडचिरोलीतर्फे योगासनांचे प्रात्यक्षिक करून योगदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगून योगाविषयी माहिती दिली. सुदृढ आरोग्याकरीता योगाभ्यासाचे पुरातन काळापासूनचे महत्व त्यांनी सांगितले. योग साधनेद्वारे शारीरिक, मानसिक, बौध्दिक प्रगती साधल्या जाते. योगामुळे अनेक आजारांपासून मानवाला संरक्षण मिळू शकते. एवढेच नव्हे तर आरोग्याच्या संवर्धनासाठी योग हा अत्यंत प्रभावशाली उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवम ईन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चातगावच्या उपप्राचार्य जागृती हेमके, प्रा.सिमरन शेख, डॉ.साळवे नर्सिंग कॉलेजच्या पूजा मडावी, विधा दुग्गा, अनिल मेश्राम, स्टुडंन्ट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष सानु कोंडागुर्ला, माजी अध्यक्ष निकिता सडमेक इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक अंजली चंद्रागडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीशा अल्लुर यांनी तर आभार प्रदर्शन सोनिया कावळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी हलामी, पल्लवी बोरकर, विभा निकुरे, शुभांगी गेडाम, आचल मेश्राम, सोनाली धुळसे, छबीलशाह आत्राम, रविना हिचामी, देवांगणा झाडे, संस्कृती खंडारे, प्रतिक्षा कुलयेटी, सरोज मेश्राम, प्रणाली तुलावी, सेजल सोनके, रोहीनी नंदेश्वर, स्वाक्षी गायकवाड, रविना भक्तु, आचल दर्रो, दिव्या मडावी, साक्षी मडावी, सायली भुरे, देविका कटीगंल, राखी मोगरकर, अस्मीता नरोटे, शुभोगी सयाम, प्राची पिंपरे, ओमदेवी वाघाडे, शरद अलोने, चेतन मडावी, करिना बढ़ाई, सनिया बेडकी, माधवी बोरकुटे, गोपिका कडुमरी, आकांक्षा चौधरी, पुर्वाक्षी देशमुख, नंदिनी मेश्राम. रोहीनी मोहुरले, सानिया सडमेक, जानवी उईके, स्वीटी नरोटे, हर्षद मडावी, पियुष नंदेश्वर, दिव्या मोरे इत्यादीनी सहकार्य केले.
192 सीआरपीएफ बटालियनने साजरा केला योग दिन
योगा स्वत:साठी आणि समाजासाठी या संकल्पनेनुसार केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 192 बटालियनच्या वतीने दि.21 ला योगा दिन साजरा करण्यात आला. बटालियन कमाण्डंट परविन्दर सिंह यांच्या मार्गदर्शनात तथा द्वितीय कमांड अधिकारी नरेन्द्र कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बटालियन मुख्यालयात योग शिबिराचे आयोजन केले होते. यात शाळकरी विद्यार्थी आणि जवानांचे कुटुंबियही सहभागी झाले होते. यावेळी द्वितीय कमांड अधिकारी नरेन्द्र कुमार यांनी योगाचे महत्व सांगितले. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले. 192 बटालियनच्या वतीने आपल्या जवानांसाठी नियमित योग कार्यक्रम घेऊन एका मिशनच्या रूपाने सामान्य नागरिकांसाठीही जिल्हाभर या कार्यक्रम घेऊन सुदृढ भारत निर्मितीसाठी योगदान देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.