गडचिरोली : नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत अमाप पैशाची उधळपट्टी, ईव्हीएम मशिनमधील हेराफेरी, निवडणुकीतील इतर गैरप्रकार यामुळे लोकांचा स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुकांवरील विश्वास कमी होत आहे, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) या पक्षाने केला आहे. हे रोखण्यात निवडणूक आयोगाची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत या पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि.10) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन निदर्शने केली.
राष्ट्रपती, पंतप्रधान, निवडणूक आयुक्तांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात बीआरएसपीच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी व मते खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या काळ्या पैशाचा वापर केल्याचे म्हटले.
यावेळी गडचिरोलीत जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागरिकांना पत्रकं वाटून त्यांच्या सह्यासुद्धा घेण्यात आल्या. यावेळी गडचिरोली जिल्हा महासचिव अरविंद वाळके, महिला जिल्हाध्यक्ष विद्या कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष रेखा कुंभारे, जिल्हा सचिव आवडती वाळके, जिल्हा युवा अध्यक्ष वैभव दरडे, जिल्हा प्रभारी तुषार रामटेके, ज्येष्ठ नेते विलास कुंभारे, चंद्रप्रकाश गेडाम, मिथुन गेडाम तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.