गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोलीत आज (दि.17) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा होणार आहे. धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी 11 वाजता ही सभा होत आहे. दुसरीकडे देसाईगंज येथे दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा होत आहे. एकाचवेळी दोन मोठ्या सभांमुळे पोलीस यंत्रणेवर चांगलाच ताण आहे.
काल नक्षल्यांनी पेरून ठेवलेले बॅाम्ब शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. नक्षलवाद्यांच्या या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
महायुतीचे गडचिरोली मतदार संघाचे उमेदवार डॅा.मिलींद नरोटे, आरमोरी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार कृष्णा गजबे आणि अहेरी मतदार संघाचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची ही सभा होत आहे. त्यामुळे तीनही मतदार संघातील मतदार या सभेसाठी येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने देशातील माओवादी चळवळ मोडीत काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे काही वर्षांपासून जिल्ह्यातील नक्षलवाद बॅकफूटवर गेलेला दिसून येत आहे. अशा स्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नक्षलग्रस्त गडचिरोलीत सभा होत आहे.
या प्रचार सभेला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, विधानसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी केले आहे.