गडचिरोली पोलिसांनी उधळून लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा कट

भामरागडजवळ पेरलेली स्फोटके नष्ट

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी भामरागडजवळच्या पर्लकोटा नदीजवळ पेरून ठेवलेली स्फोटके शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. बॅाम्ब शोधक-नाशक पथकाने सुरक्षितपणे स्फोट घडवून आणत ती नष्ट केली.

भामरागड आणि ताडगावला जोडणा­ऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (IED) पेरून ठेवली आहेत, अशी गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून शनिवारी (दि.16) वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीहून तातडीने बॅाम्ब शोधक-नाशक पथकाला हेलिकॅाप्टरने पाठविण्यात आले. तसेच जिल्हा पोलीस दल, सीआरपीएफ आणि बीएसएफच्या एकत्रित पथकाने शोध अभियान सुरू केले. त्यात दोन स्फोटके (IED) सापडले.

बीडीडीएस पथक सदर स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा (IED) स्फोट झाला, तर दुसरे स्फोटक बीडीडीएस पथकाने घटनास्थ्ळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केले. त्यानंतर सदर परिसरात अजुन कुठे स्फोटके पेरली आहेत का, याबाबत पुन्हा शोध अभियान सुरु असताना अजुन एक आयईडी (क्लेमोर) आढळून आले. बीडीडीएस पथकाने तेसुद्धा नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केले.

या सर्व कार्यवाहीत सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही. तसेच सदर परिसरात अजून शोध अभियान सुरू आहे. गडचिरोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घातपात घडवून आणण्याचा व सुरक्षा दलास नुकसान पोहोचविण्याचा डाव हाणून पाडण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्रेणिक लोढा व उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली बीडीडीएसचे प्रभारी अधिकारी पो.उपनिरीक्षक मयुर पवार यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली.