कामांच्या अंमलबजावणीवरून गाजली देसाईगंज पं.स.ची वार्षिक आमसभा

आमदार कृष्णा गजबे यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना धरले धारेवर

आमसभेत अधिकाऱ्यांना निर्देश देताना आ.कृष्णा गजबे

देसाईगंज : नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र, तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. मात्र योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत नसल्याची बाब स्थानिक नागरीकांनी उपस्थित करताच पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत सभाध्यक्ष आमदार कृष्णा गजबे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. योजनांची यथाशिघ्र अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

देसाईगंज पंचायत समितीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आमदार कृष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कामचुकार अधिकाऱ्यांना आमदार गजबेंनी चांगलेच धारेवर धरून समस्या यथाशिघ्र मार्गी लावण्याचे निर्देश दिले. यावेळी देसाईगंजचे तहसीलदार के.व्ही.चौधरी, संवर्ग विकास अधिकारी धिरज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, जयमाला पेंदाम, रोशनी पारधी, माजी सभापती मोहन गायकवाड, रेवता अलोणे, माजी उपसभापती नितीन राऊत, शेवंता अवसरे, गोपाल उईके, अर्चना ढोरे, कोंढाळ्याच्या सरपंच अपर्णा राऊत आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

देसाईगंज पंचायत समितीच्या २० ग्रामपंचायतीअंतग॔त ३९ गावे येतात. शासन स्तरावरुन प्रत्येक गावाच्या विकासासाठी विकास आराखड्यानुसार नियोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात येतो. त्यानुसार विकासकामे होणे देखील अपेक्षित आहे. प्रत्यक्षात विकासकामांची अंमलबजावणी होत नसल्याने स्थानिक नागरीकांच्या रोषाला पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते.ही गंभीर बाब लक्षात घेता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपापली जबाबदारी ओळखून कर्तव्यपालन करण्याच्या सुचना आ.गजबे यांनी दिल्या.