सहकार क्षेत्रासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली. शनिवार आणि रविवारी जाहीर झालेल्या निकालात पुन्हा एकदा सावकार गटाने आपला दबदबा कायम ठेवला. महत्वाच्या गडचिरोली आणि आरमोरी बाजार समितीमध्ये भाजपप्रणित सावकार गटाने, चामोर्शी बाजार समितीत माजी सभापती अतुल गण्यारपवार गटाने तर अहेरी बाजार समितीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आदिवासी विद्यार्थी काँग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांच्या गटाने बाकी मारत वर्चस्व निर्माण केले. या चारही बाजार समित्यांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. सिरोंचा कृषी उपन्न बाजार समितीसाठी रविवारी निवडणूक होऊन रात्री निकाल जाहीर करण्यात आला. या ठिकाणी सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हातमिळवणी केली होती. त्यामुळे या ठिकाणची निवडणूक केवळ औपचारिकता ठरली.
शनिवारी गडचिरोली, आरमोरीमधील निकालानंतर पोरेड्डीवार गटासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी इंदिरा गांधी चौकात आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला यावेळी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्यासह प्रकाश सावकार
पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे व इतर पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन नवनिर्वाचित संचालक व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. विशेष म्हणजे इतर जिल्ह्यांमध्ये महविकास आघाडीने भाजपला घेरून पराभूत करण्याची रणनीती यशस्वी केली असताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र वेगळे चित्र दिसले.