गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या किसान आघाडीची जिल्हा बैठक मंगळवारी विश्राम भवनात किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन सदर योजना गावागावात पोहोचवून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे आवाहन किसान आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना केले.
या बैठकीला खासदार तथा पक्षाच्या जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ललीत समदुरकर, प्रदेश सचिव रंगनाथ सोळंके, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, गोविंद सारडा, किसान आघाडीचे प्रदेश प्रतिनिधी रमेश भुरसे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, अनिल पोहणकर, जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, जिल्हा सचिव गिता हिंगे, जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, पल्लवी बारापात्रे, माजी नगरसेविका लता लाटकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खा.अशोक नेते यांनी शासनाच्या शेतकऱ्यांशी संबंधित योजनांवर प्रकाश टाकला. जगाचा पोशिंदा, अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी सुरू केला. याचा लाभ जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांना होत आहे. जे १० टक्के वंचित आहेत, त्यांचे फॅार्म आॅनलाईन भरून प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे खा.नेते म्हणाले.