अतिदुर्गम भागातील महिला शेतकरी निघाल्या राज्यात कृषीदर्शन सहलीला

पोलिसांसह आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा पुढाकार

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने शेती करतात. मात्र शेतीमधून प्राप्त होणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळत नाही. त्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती कशी करता येईल याची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी दुर्गम भागातील महिला शेतकऱ्यांची सहल पोलिस आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. ५० महिला शेतकऱ्यांच्या या चमुला पोलिस दादालोरा खिडकी या उपक्रमाच्या माध्यमातून सहसीसाठी रवाना करण्यात आले.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पेंढरी, कारचाफा पोलिस स्टेशन, कोटगुल, ग्यारापत्ती, सावरगाव, कटेझरी, मुरुमगाव, गोडलवाही, गड्डा (फु.) पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील ५० महिला शेतकऱ्यांकरीता काढलेली ही आतापर्यंत सातवी कृषीदर्शन सहल तर सन २०२३ मधील तिसरी सहल आहे.

या ठिकाणी देणार भेटी
या सहलीमध्ये कुरखेडा, धानोरा व पेंढरी उपविभागातल्या दुर्गम भागातील ५० महिला शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. या सहलीदरम्यान सहभागी महिला शेतकरी नागपूर, अकोला, शेगाव, जळगाव, अमरावती, वर्धा, वरोरा, भद्रावती येथील कृषी विज्ञान केंद्र,तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील अकोला व घातखेड येथील कृषी विद्यापिठांना भेटी देणार आहे. या भेटीत शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणून घेणार आहेत. यातून त्या आर्थिक उन्नती साधुन जीवनमान उंचावतील.