गडचिरोली : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपची भूमिका, महत्वाचे मुद्दे आणि रणनिती ठरविण्यासंदर्भात भाजप कोअर कमिटीची बैठक मुंबईत झाली. दि.19 आणि 20 जुलै असे दोन दिवसीय चाललेल्या या बैठकीला पक्षाच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते हेसुद्धा उपस्थित होते.
पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी असलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्रसिंह यादव आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तथा राज्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पक्षबांधणीसोबत विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाची भूमिका, महायुतीमधील घटक पक्षांशी समन्वय ठेवत विजयाचे गणित कसे अधिक सोपे करता येईल, यावर या बैठकीत चर्चा होऊन वरिष्ठांनी मार्गदर्शन केले.