एटापल्ली : राज्य शासनाच्या विविध योजना लोकाभिमुख असून त्या योजना व सोयी, सवलती नागरिकांपर्यंत पोहोचवा. हयगय, हलगर्जीपणा, दिरंगाई, कामचुकारपणा करणारे अधिकारी व कर्मचारी यांची गय केली जाणार नाही, असा सूचनावजा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी एटापल्ली येथील आढावा बैठकीत दिला.
स्थानिक तहसील कार्यालयात शुक्रवारी विविध शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन विकासात्मक कामांचा मागोवा घेण्यात आला. जी कामे रखडत आहेत त्यावर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ना.आत्राम यांनी खडे बोल सुनावले.
यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी आदित्य जिवणे, एसडीपीओ चेतन कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी प्रवीण चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रदेश सरचिटणीस युनूस शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी धर्मरावबाबा यांनी रस्ते, वीज, सिंचन, शिक्षण, कृषी, आरोग्य, वन जमिनीचे पट्टे, पोषण आहार या व अन्य योजनांचा मागोवा घेऊन दिरंगाई व थंडबस्त्यात असणाऱ्या कामांविषयी कडक शब्दात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताशेरे ओढले, तर प्रगतीपथावर असणाऱ्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी कटाक्षाने लक्ष घालावे, असे म्हणत विकासात्मक कामांवर अधिक भर दिला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, तालुक्यातील विविध गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.