गडचिरोली : भाजपच्या बुथ स्तरापासून मंडळ आणि जिल्हास्तरापर्यंतच्या सर्व आघाड्यांच्या रचना १५ दिवसात पूर्ण करून बुथ नियोजनावर भर द्या. ‘बुथ जितो, चुनाव जितो’ या घोषवाक्याला अनुसरून बुथस्तरावरील संपूर्ण माहिती ठेवत पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा भाजपचे सरकार आणण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून कामाला लागावे, असे आवाहन भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री, खासदार अशोक नेते यांनी केले.
मंगळवार, १६ जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यसमितीची विस्तृत बैठक येथील सुमानंद सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला प्रामुख्याने मंचावर विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश सा.पोरेड्डीवार, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, पक्षाचे लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, पक्षाचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, योगिता पिपरे, सदानंद कुथे, गोविंद सारडा, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, ओबिसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, किसान आघाडीचे रमेश बारसागडे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत, बंगाली समाजाचे नेते दीपक हलदार, गडचिरोली शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, सोमया पसुला, गोवर्धन चव्हाण, रामभाऊ पडोळे, तसेच मोठया संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बैठकीत बोलताना खा.अशोक नेते म्हणाले, देशाला जगात एक नंबरवर आणायचे असेल तर पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवावे लागेल. याकरिता पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापले बुथ व बुथवरील सर्व घटकांचा अभ्यास करत बुथस्तरीय संघटना मजबुत करावी. आजच्या घडीला भारतीय जनता पक्ष भारतातला एक नंबरचा पक्ष आहे. अशा पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आहात. हे स्थान कायम ठेवण्यासह ते आणखी मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे पक्षसंघटनेच्या कामाला वाहून घ्या, असे आवाहन यावेळी खा.अशोक नेते यांनी केले. विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांनीही या बैठकीत पक्ष संघटनेबद्दल विस्तृत माहिती देत मार्गदर्शन केले. इतरही मान्यवरांनी आपले विचार मांडले.
यावेळी कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्र आणि नेमप्लेटचे वितरण करण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, संचालन जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांनी तर आभार जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांनी मानले.