गडचिरोली : अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त असलेल्या छत्तीसगड सीमेकडील भागात गर्देवाडा येथे पोलिस मदत केंद्र, अर्थात पोलिस स्टेशन सुरू करण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह गावातील नागरिकांच्या उपस्थितीत या पोलिस मदत केंद्राच्या फलकाचे सोमवारी (दि.१५) अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे एक हजार पोलिस कमांडो आणि मोठ्या साधनसामग्रीच्या सहाय्याने गावाबाहेरच्या जंगलात अवघ्या २४ तासात पोलिस केंद्राच्या संरक्षक भिंतीसह टेंट उभारणीचे काम करण्यात आले.
पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक जगदीश मीना, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, सीआरपीएफचे उपकमांडंट वर्मा यांच्यासह हेडरीचे एसडीपीओ बापुराव दडस, गर्देवाडाचे प्रभारी अधिकारी सपोनि बाळासाहेब जाधव आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
नक्षलवाद्यांच्या गडात उभारलेल्या या पोलिस केंद्रामुळे या भागातील अनेक विकासात्मक कामांना गती मिळणार आहे. शिवाय या भागातील नक्षलवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे केंद्र महत्वाचे ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.