गडचिरोली : आगामी निवडणुकांची तयारी म्हणून भाजपने बुथ मजबुतीकरणावर भर दिला आहे. बुथस्तरावरील मतदारांशी संवाद साधून त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हे प्रवासी कार्यकर्ते म्हणून बुथस्तरावर मुक्कामी जाणार असल्याची माहिती भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
हे अभियान येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यासाठी जिल्हा संयोजक म्हणून भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विधानसभानिहाय संयोजकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यात गडचिरोलीसाठी प्रकाश गेडाम, आरमोरीसाठी सदानंद कुथे तर अहेरीसाठी संदीप कोरेत यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय २४ मंडळांमध्ये २४ संयोजक नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाभरातील ९३३ बुथवर हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात सर्वसमावेशक बुथरचनेची तपासणी केली जाणार असून आवश्यक ते बदलही ते करतील.
वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी १२० कोटी मंजूर
वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गासाठी यापूर्वी ३२२ कोटी रुपये मंजूर झाले आहे. नुकत्याच सादर झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटमध्ये पुन्हा १२० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे रेल्वेमार्गाचे काम जोमाने सुरू आहे. राज्य सरकारकडूनही त्यांचा ५० टक्के वाटा या प्रकल्पासाठी मिळणार असल्याचे यावेळी खा.अशोक नेते यांनी सांगितले.
या पत्रपरिषदेला लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, विधानसभा विस्तारक दामोदर अरिगेला, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा सचिव रंजिता कोडाप, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, अनिल कुनघाडकर, विनोद देवोजवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.