गडचिरोली : सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी आणि समस्या दूर करण्यासाठी पहिल्यांदाच त्यांच्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. सेवानिवृत्त पोलिस अधिकारी-कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन या नावाने स्थापित या संघटनेचा महामेळावा बुधवारी (दि.७) गडचिरोली येथील पोलिस मुख्यालयाच्या एकलव्य सभागृहात घेण्यात आला. यावेळी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत संघटनेच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली, तसेच सेवानिवृत्तांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली.
सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त तथा संघटनेचे सहअध्यक्ष अॅड.सिताराम न्यायनिर्गुने (मुंबई), तर अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त तथा कार्याध्यक्ष सुखानंद साब्दे, तथा सेवानिृत्त पोलिस उपायुक्त तथा गडचिरोलीचे प्रमुख सल्लागार एन.झेड.कुमरे उपस्थित होते. याशिवाय बी.डी.मडावी, दामदेव मंडलवार, नारायण बच्चलवार हेसुद्धा मंचावर विराजमान होते.
माजी पोलिस महासंचालक स्व.टी.के.चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बी.डी.मडावी यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले.
यावेळी सुखानंद साब्दे यांनी मेळाव्यात उपस्थित सर्व निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर येणाऱ्या अडीअडचणी, कार्यालयीन प्रलंबित कामकाज वेळेवर सुरळीत पार पाडण्यासंबंधी, तसेच पोलिस महासंचालक कार्यालयाकडील परिपत्रक, जीआर याबाबत सविस्तर माहिती दिली.
अॅड.सीताराम न्यायनिर्गुने यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना वेळेवर सोईसुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या कार्यालयीन कामकाजात अडीअडचणीचे वेळेवर निराकरण करणे, तसेच प्रत्येक दोन महिन्यात एकदा आयोजित करण्यात येणाऱ्या मेळावा तथा बैठकीबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा संघटनेचे उपाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे यांनी केले. आभार प्रदर्शन सेवानिवृत पोलिस निरीक्षक तथा कार्याध्यक्ष दामदेव मंडलवार यांनी केले. सदर महामेळावा यशस्वी करण्याकरीता संघटनेचे सचिव नारायण बच्चलवार, सहसचिव दादाजी ओल्लालवार, शरद पोटवार, गजानन सहारे, दिलीप वडेट्टीवार, चरणदास पेंदाम, तुळशिराम दुर्गे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. या मेळाव्याला जिल्ह्यातील २०० वर सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.