गडचिरोली : गडचिरोलीकरांचे आराध्य दैवत असलेल्या सेमाना देवस्थानाच्या परिसरात रविवारी (दि.१६) एक आगळीवेगळी डबा पार्टी (टिफिन बैठक) झाली. यात इतर डबा पार्टीप्रमाणे सर्वांनी आपापले डबे आणले, पण त्यात सहभागी होणारे कोणी शाळकरी विद्यार्थी किंवा एखाद्या सोसायटी किंवा संघटनेचे सदस्य नव्हते, तर ते होते चक्क खासदार, आमदार अन् भाजपचे पदाधिकारी व सदस्यगण. मोदी @ 9 या अभियानांतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या पदाधिकारी आणि सदस्यांसोबत संवाद साधून झालेल्या कामांचा आढावा घेऊन पुढील नियोजनाची माहिती यावेळी देण्यात आली.
खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या नेतृत्वातील या टिफिन बैठकीत सर्वांनी आपापला जेवणाचा डबा आपल्या घरून आणला होता. खाली बसून सर्वांनी एकमेकांचे अन्न वाटून घेतले. यावेळी पदाधिकारी आणि सदस्यांशी खा.नेते यांनी संवाद साधून साधकबाधक चर्चा केली. सामूहिक भोजन हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. त्याचे महत्व समजून घेऊन त्याचा आदर आपण सर्वांनी केला पाहिजे. अनेक कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबद्दल गैरसमज असतात. या निमित्ताने आपण एकत्रित येऊन, एकत्रित बसून आहाराचा आनंद घेतल्याने एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होतो, असे मार्गदर्शन यावेळी खा.नेते यांनी केले.
यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, प्रदेश सरचिटणीस (एसटी मोर्चा) प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, संपर्क प्रमुख विलास भांडेकर, माजी पं.स.सभापती विलास दशमुखे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देओजवार, सुरेश राठोड, तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, धानोरा युवा मोर्चाचे अध्यक्ष सारंग साळवे, शहर उपाध्यक्ष श्रीकांत पतरंगे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, शहराध्यक्ष कविता उरकुडे, महिला मोर्चाच्या शहर महामंत्री वर्षा शेडमाके, अर्चना निंबोड, वैष्णवी नैताम, कोमल बारसागडे, रश्मी बाणमारे आदी पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रमोद पिपरे यांनी दिली आगामी कार्यक्रमांची माहिती
या टिफिन बैठकीत मार्गदर्शन करताना भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी पक्षाच्या आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. त्यात आपल्या वार्डातील व गावातील विशेष व्यक्ती संपर्क, घर संपर्क, बुथ सशक्तिकरण अभियान, सरल ॲप, नमो ॲप डाऊनलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या. प्रत्येक बूथमध्ये किती घरांशी संपर्क झाला? घरातील किती सदस्यांकडून मिस कॉल करण्यात आला? नव मतदार नोंदणी व बोगस मतदार याची किती नोंद झाली? घरातील किमान एक नंबर बूथ जनता व्हाट्सअॅप ग्रुप मध्ये जोडला का? बूथ मधील घरनिहाय सर्व सदस्यांची पूर्ण नावे, मोबाईल नंबर, मतदार क्रमांकासह सलग मतदार यादी तयार केली का? बूथनिहाय किती भिंतीवर कमळ चिन्ह काढले? याची विचारणा कार्यकर्त्यांना केली. येत्या 22 जुलैपर्यंत सर्व कामांची पूर्तता करण्यासंबंधी सूचना पिपरे यांनी दिल्या.