12 पैकी 8 तालुक्यात अतिवृष्टी, मेडीगड्डाचे दरवाजे उघडले

पऱ्हे रोवणीला येणार वेग

रविवारी सकाळी अनेक मार्गावर असे पाणी साचले होते.

गडचिरोली : यावर्षी उशिरा का होईना, पावसाने अखेर जिल्ह्यात सर्वदूर चांगली हजेरी लावली. रविवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार 24 तासात जिल्ह्यातील 12 पैकी 8 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. सर्वाधिक ११४ मिमी पाऊस गडचिरोली तालुक्यात झाला. त्यामुळे काही मार्गही बंद झाले होते. संध्याकाळी काही मार्गावरील वाहतूक सुरू झाली.

गडचिरोली तालुक्यात 114.4 मिमी, कुरखेडा 81.6 मिमी, आरमोरी 81.8 मिमी, चामोर्शी 83.3 मिमी, सिरोंचा 44.1 मिमी, अहेरी 47.4 मिमी, एटापल्ली
59.8 मिमी, धानोरा 82.6 मिमी, कोरची 76.4 मिमी, देसाईगंज 90.0 मिमी, मुलचेरा 67.2 मिमी, तर भामरागड तालुक्यात 35.7 मिमी पावसाची नोंद झाली.

या पावसामुळे कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र काही छोट्या नद्यांना पूर आल्याने रपटे पाण्याखाली जाऊन वाहतूक खोळंबली होती. गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 31 गेट उघडल्याने वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. मेडीगड्डा (लक्ष्मी बॅरेज) प्रकल्पाचे 85 पैकी 22 गेट उघडले असून विसर्ग 1620 क्युमेक्स (57,210 क्युसेक्स) सुरू आहे. चिचडोह बॅरेजचे 38 पैकी 38 गेट उघडलेले असून विसर्ग 5,049 क्युमेक्स (1,78,305 क्युसेक्स) आहे.

रविवारी संध्याकाळी लाहेरी ते कुवाकोडीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग (बिनागुंडा नाला) (ता.भामरागड), चांदाळा ते कूंभी मार्ग (ता.गडचिरोली) आणि रानमूल ते माडेमूल (ता.गडचिरोली) हे मार्ग बंद होते.