अहेरी : भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राबविल्या जात असलेल्या महाजनसंपर्क अभियानाचा एक भाग म्हणून शनिवारी अहेरीत विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे संमेलन घेण्यात आले. राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपच्या जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते आणि माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा मतदार संघाचे प्रमुख अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या संमेलनासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.
यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील कल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान कसे उंचावत आहे याची माहिती दिली. विकासात्मक कामांना या काळात गती मिळाळ्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर होत असून भविष्यात हा जिल्हा विकासित जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार अशोक नेते यांनी या उद्योगविरहित जिल्ह्यात कोसनसरीसारखा लोहप्रकल्प, सुरजागडची खाण आणि भविष्यात येऊ घातलेल्या विविध उद्योगांमुळे या जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न दूर होण्यासोबत विविध भौतिक सुविधांची भर पडेल. परंपरागत पद्धतीने दारिद्रयात जीवन जगणाऱ्या आदिवासी समाजाला विकासाच्या वाटेवर आणणे शक्य होणार आहे. यासोबत जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे अभूतपूर्व जाळे विणले जात आहे. रेल्वेमार्गाच्या कामाला गती आली आहे. गेल्या कित्येक वर्षात होऊ न शकलेला विकास या जिल्ह्याला आता पहायला मिळत आहे. मोदी सरकारच्या दूरदृष्टीमुळेच हे शक्य होत असल्याचे खा.नेते म्हणाले. ना.देवेंद्र फडणविस, ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांमुळे विदर्भाला विकास कामांसाठी भरघोस निधी मिळाल्याची आठवणही त्यांनी करून दिली. तसेच काश्मिरमधील कलम ३७० हटविणे, मुस्लिम महिलांच्या सन्मानार्थ बनविलेला नवीन तलाखचा कायदा, समान नागरिकत्व, अयोध्येतील राम मंदिराची उभारणी या मुद्द्यांनाही हात घातला. माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी भाजप सरकारच्या काळात या मागास जिल्ह्याच्या विकासाला मिळालेली गती पाहून गडचिरोलीला नवी ओळख मिळत असल्याचे सांगितले.
हकीम सेलेब्रेशन हॅालमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मंचावर भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, जिल्हा युवा मोर्चाचे प्रभारी अनिल डोंगरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार यांच्यासह अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, मुलचेरा तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, सिरोंचा तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, एटापल्ली तालुकाध्यक्ष विजय नलावार, भामरागड तालुकाध्यक्ष दशस्थ आत्राम, सुनील विश्वास यांच्यासह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, महिला-पुरूष लाभार्थी उपस्थित होते.
सुरूवातीला दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी अहेरी येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने भल्यामोठ्या हाराने ना.सुधीर मुनगंटीवार, खा.अशोक नेते आणि अहेरी विधानसभा प्रमुख अम्ब्रिशराव आत्राम यांचा सत्कार करण्यात आला. विविध विविध नेत्यांच्या जयघोषाने सभागृह दणाणून गेले होते. रिमझिम पाऊस सुरू असतानाही कार्यक्रमाला झालेली गर्दी लक्षणिय होती. यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक जणांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.