अतिक्रमित एकतानगर झोपडपट्टीवासियांना मिळणार हक्काची घरे

तीन दिवसांच्या ठिय्या आंदोलनानंतर न.प. प्रशासनाचे आश्वासन

गडचिरोली : येथील गोकुळनगर तलावालगत अतिक्रमण करून राहणाऱ्या एकतानगर झोपडपट्टीवासियांचे अतिक्रमण नगर परिषदेने तोडल्यानंतर तेथील नागरिकांनी गेल्या तीन दिवसांपासून नगर परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. अखेर शुक्रवारी न.प.प्रशासनाने त्यांना सरकारी योजनेतून हक्काची घरे मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

एकतानगरातील १९० लोकांनी तलावालगत केलेले अतिक्रमण दि.२१ ला गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने पोलिसांची मदत घेऊन हटविण्यात आले. यात सदर नागरिकांच्या घरातील साहित्य, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. त्यामुळे या नागरिकांचा निवारा हिरावला जाऊन त्यांच्यापुढे कुठे राहायचे, असा प्रश्न निर्माण झाला. वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नगर परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. दि.२१ च्या संध्याकाळपासून हे लोक आपल्या परिवारातील सदस्यांसह न.प.च्या आवारात ठाण मांडून बसले होते.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्याशी वाटाघाटी करत तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानुसार न.प. प्रशासनाने प्रधानमंत्री आवास योजनेतून त्या नागरिकांना नियमानुसार हक्काची घरे देण्याचे आश्वासन दिले. संबंधित नागरिकांनी कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज केल्यानंतर त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जाईल. मंजुरीनंतर घरांच्या बांधकामासाठी शासनाकडून अडीच लाख रुपये प्रतिकुटुंब दिले जाईल, असे उपमुख्याधिकारी रविंद्र भांडारवार, कनिष्ठ अभियंता अंकुश भालेराव यांनी सांगितले.
दरम्यान अतिक्रमण हटविताना झालेल्या नुकसानीची भरपाईसुद्धा न.प. प्रशासनाने द्यावी अशी मागणी बाळू टेंभुर्णे यांनी केली.