भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेचे चामोर्शीत दिंडीने स्वागत, मार्कंडेश्वराला साकडे

धानोरा तालुक्यातही डॅा.नरोटेंचा जनसंपर्क

गडचिरोली : महायुती व भारतीय जनता पक्षाच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रात जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून डॅा.मिलिंद नरोटे यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. चामोर्शी तालुक्यातील विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देवस्थान परिसरात दिंडीच्या माध्यमातून डॅा.नरोटे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी महादेवाच्या पिंडीसह मार्कंडेश्वर ऋषीच्या मंदिरात दर्शन घेऊन चामोर्शी तालुक्यातील यात्रेला प्रारंभ केला.

तालुक्यातील मार्कंडा, फराडा, मोहुर्ली, रामाळा, घारगाव, खंडाळा, दोटकुली, वाघोली, वेलतुर, एकोडी, कमळमगांव, कान्होली, सगणापूर, मुरखळा माल, नवेगाव माल, कोकुर्डी, कोंडाळा, चाकलपेठ, वागदरा, नागपूर चक, मुरखळा चक, वाकडी, रामसागर, लखमापूर बोरी, भिक्षी, हळदी माल, गणपूर या गावांमधून रॅलीच्या माध्यमातून यात्रा पोहोचल्यानंतर नागरिकांचा आशिर्वाद घेत पुढे मार्गक्रमण करण्यात आले.

ही यात्रा दोटकुली येथे पोहोचल्यानंतर नागरिकांकडून दिंडी काढून डॅा.नरोटे यांचे स्वागत करण्यात आले. यात्रेतून महायुतीसह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मागील 10 वर्षांत भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती सांगितली. गड़चिरोली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची समस्या, मुलांच्या शिक्षणासाठी येणाऱ्या आर्थिक समस्येवर मात करण्याची ग्वाही देत मतदार बांधवांच्या सुदृढ आरोग्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे डॅा.नरोटे यांनी सांगितले. गड़चिरोली विधानसभा क्षेत्रातील भाजप व महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जनआशिर्वाद यात्रेत सहभागी झाले होते.

धानोरा तालुक्यातील नागरिकांचा घेतला आशिर्वाद

चामोर्शीनंतर डॅा.नरोटे यांनी धानोरा तालुक्यातील मालंदा, चव्हेला, बोदिन, कामनगड़, सावंगा, पेकिंगमुडझा, पेंढरी, ढोरगट्टा, दुर्गापूर व खर्गी येथील नागरिकांशी संवाद साधला. आदिवासीबहुल, नक्षलपीड़ित, दुर्गम क्षेत्रात वसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून व शेतकरी आधुनिक शेती करण्यापासून वंचित असल्याचे निरीक्षण डॅा.मिलिंद नरोटे यांनी नोंदविले. अनेक शेतकरी व विद्यार्थी बांधवांसोबत त्यांनी संवाद साधला. आपल्या समस्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकार दूर करतील, असा विश्वास अनेक नागरिकांनी व्यक्त केला.

महायुती व भाजपचा उमेदवार या नात्याने मी शालेय शिक्षाणासोबत कृषि क्षेत्राचा दर्जात्मक विकास करण्याचा प्रयत्न करणार, असे डॅा.नरोटे यांनी सांगितले. माझ्यासाठी माझी जनता व जनतेचा विकास हा महत्वाचा मुद्दा आहे, असे डॉ.नरोटे यांनी म्हटले. त्यांना युवक व प्रौढ व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ते ज्या क्षेत्रात पोहोचत आहेत, तिथे सामान्य नागरिकांचा आशीर्वाद त्यांना मिळत आहे. सर्व मतदारांच्या समस्या डॅा.नरोटे सोडवतील, अशी ग्वाही यावेळी नागरिकांना देण्यात आली. जनआशिर्वाद यात्रेदरम्यान महायुती व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.