गडचिरोली : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीची बैठक गुरूवारी (दि.10) शासकीय विश्रामगृहात माजी खासदार आणि भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा विधानसभा निवडणूक संचालन समितीचे सहसंयोजक अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना नेते यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये युवकांवर महत्त्वाची जबाबदारी राहणार असून युवकांनी भाजपच्या विजयाचा संकल्प करत संघटनेचे काम करावे, असे आवाहन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना अशोक नेते म्हणाले, अगोदर माझीही सुरुवात भाजप युवा मोर्चापासूनच झाली. भारतीय जनता पक्षाचे काम मी युवा मोर्चापासूनच सुरु केले. त्यानंतर हळूहळू संघटनेचे काम वाढवून गडचिरोली जिल्ह्यात पक्षविस्तार करण्यात माझाही मोलाचा वाटा आहे. त्याचेच फळ आज आपल्याला मिळत आहे. युवा मोर्चांने प्रभावीपणे काम करावे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये युवकांची महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे. युवकांनी भाजपच्या विजयाचा संकल्प करत संघटनेचे काम करावे. संघटनेमध्ये काम करताना अनेक अडीअडचणी येतात. मात्र त्यावर मात करत संघटन वाढवावे. आपल्या पदाची गरिमा काम करणाऱ्याच व्यक्तीवर अवलंबून असते, ती वाढवण्याचा प्रयत्न करावा, अशीही सूचना केली.
गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात झालेली विकासाभिमुख कामे जनतेपर्यंत पोहोचवावी, असे नेते म्हणाले. त्यात रेल्वेमार्गाचे काम सुरू होणे, चिचडोह, कोटगल बॅरेजेस, गोंडवाना विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे अशी एकापेक्षा एक सरस अनेक विकास कामे झाली, ती जनतेपर्यंत युवा मोर्चाने पोहोचवावी, असे मा.खा.नेते म्हणाले.
या बैठकीला प्रामुख्याने आ.डॉ.देवराव होळी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, भाजयुमोचे प्रदेश चिटणीस चिंतामण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष अनिल डोंगरे, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख व्ही.एन.रेड्डी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, आशिष कोडापे, मंगेश रणदिवे तसेच जिल्ह्यातील भाजयुमो पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.