शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भर पावसात चक्काजाम आंदोलन

जनसुरक्षा विधेयकालाही विरोध

आरमोरी : शेतकरी कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी गुरूवारी (दि.24) विरोधी पक्षांकडून राज्यात सर्वत्र चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते. त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव-ठाणेगाव येथील बस थांब्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा सुरू आहे. शेतकरी आत्महत्येच्या गावातून सातबारा कोरा करा, या शीर्षकाखाली पदयात्रा काढण्यात आली. तरीही राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही. उलट लोकशाही मार्गाने आंदोलन दडपण्याचा उद्देशाने जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर करून घेतले, असा आरोप करत आरमोरी तालुक्यामध्ये डोंगरगाव भुसारी, ठाणेगाव बस थांबा या ठिकाणी रिमझिम पावसात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

शेतकर्याचा सातबारा कोरा करा, जनसुरक्षा विधेयक रद्द करा, 58 वर्षावरील सर्व शेतकरी, शेतमजूर, कामगारांना मासिक पाच हजार रुपये पेन्शन द्या, शेतकऱ्यांना 24 तास व मोफत विद्युत पुरवठा करा, इत्यादी नारे यावेळी देण्यात आले. यावेळी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आपल्या आंदोलनावर ठाम असलेल्या आंदोलनकर्त्यांना शेवटी पोलिसांनी जबरदस्तीने उचलून गाडीने पोलिस स्टेशना आणले.

पोलीस स्टेशनला नायब तहसीलदार दोंनाडकर यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक, मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड, लक्की पाटील, उभाठा सेनेचे सागर मने, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत बनकर, उभाठाचे तालुका अध्यक्ष भूषण सातव, मनसेचे तालुकाध्यक्ष भारत कुमरे, प्रहारचे जिल्हा सचिव अपंग आघाडीचे अनंत भोयर, विवेक ठाकरे, तसेच विकी उंदीरवाडे, होमराज माकडे यांनी केले.

या आंदोलनात देऊळगावचे माजी उपसरपंच कवडू सहारे, राजू सामृतवार, सुधीर ठाकरे, संतोष सेलोटे, सिंकदर नंदरधने, अमर उपरीकर, आकाश लोथे, अजय नारनवरे, आकाश खोब्रागडे, कवडू कत्रे, दिलीप मेश्राम यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.