गडचिरोली : तोंडात अंजीर आणि हातात खंजीर ठेवणारी माणसं तुम्हालाही आता कळली. अजित नावातच जीत आहे. दादा तुम्ही स्पष्टपणे बोलता. आता तर तुम्ही अधिक स्पष्टपणे बोलत आहात. तुम्ही असे बोलत राहा. जनतेलाही कळू द्या. मीसुद्धा यातून गेलो आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाला जाहीरपणे साद घातली. निमित्त होते गडचिरोलीत शनिवारी झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे.
सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोलीत पहिल्यांदाच जाहीर सरकारी कार्यक्रमाला हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकत्रितपणे झालेला हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. गडचिरोलीच्या एमआयडीसी परिसरातील मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाभरातून एसटी बसेसने आणण्यात आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम, तर अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री शोभाताई फडणवीस, पद्मश्री परशुराम खुणे, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, लॅायड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन, शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, भाजपचे बाबुरावजी कोहळे, रविंद्र ओल्लालवार, रेखा डोळस आदी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह विविध योजनांचे काही लाभार्थी प्रतिनिधीक स्वरूपात मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या दारी शासनाच्या योजना पोहोचल्या. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले असून जिल्ह्याच्या ११ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. शासन आणि प्रशासन ही सरकारच्या रथाची दोन चाके आहेत. अधिकारी आता गावागावात जात असल्यामुळे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे अशी प्रचिती जनतेला येत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
गडचिरोलीमध्ये स्टील सिटी उभारण्याचे नियोजन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्तीसगड, झारखंडच्या धर्तीवर गडचिरोलीमध्येही स्टील सिटी उभी करण्याचे नियोजन आहे. मी मुख्यमंत्री असताना येथील खनिज प्रकल्पाला चालना दिली. येथेच गुंतवणूक, येथेच रोजगार आणि नफा सुद्धा गडचिरोलीमध्येच, हे धोरण अवलंबिले. 20 हजार कोटींची गुंतवणूक गडचिरोलीसाठी मंजूर करण्यात आली असून यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या देण्यात आल्या आहे. मेडीकल कॅालेजनंतर गडचिरोलीत विमानतळ होण्यासाठी १४६ हेक्टर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे मोठे उद्योगही येथे येण्यास मदत होईल. जिल्ह्यातील एकही आदिवासी घरकुलापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही यावेळी फडणवीस यांनी दिली.
अधिकाऱ्यांनीही गडचिरोलीचे दौरे करावेत- पवार
जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ आणि समृद्धी महामार्ग यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्यामुळे विकास कामांना गती मिळेल अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. या जिल्ह्यात नेते मंडळींसोबत आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दौरे करून या जिल्ह्याचे प्रश्न समजून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनीही लॅायड्स मेटल्सच्या माध्यमातून या जिल्ह्यात उद्योगांसाठी दारे खुली झाली असून भविष्यात अनेक उद्योग येतील, त्यातून रोजगाराचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर स्थानिक युवकांनी रेला हे पारंपारिक नृत्य सादर केले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्री यांनी युवकांबरोबर नृत्यात सहभाग घेतला.
लॅायड्स मेटल्सचे प्रभाकरन यांचा सत्कार
यावेळी कोनसरी येथे उभारणी सुरू असलेल्या लॅायड्स मेटल्सच्या लोहप्रकल्पात जिल्ह्यातील बरोजगारांना, भूमिधारकांना नोकरी देण्यास सुरूवात करून जिल्ह्याला औद्योगिकरणाच्या नकाशावर आणल्याबद्दल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अनेकांचा केला सत्कार
महाशिबिरादरम्यान मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील पद्मश्रीप्राप्त जेष्ठ कलावंत परशुराम खुणे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच 10 मीटर शुटींगमध्ये प्राविण मिळविणाऱ्या महेश ठवरे, सिकई मार्शल आर्टसाठी एंजल देवकुले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजनांमधील लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांचे लाभही प्रातिनिधिक स्वरुपात वितरीत करण्यात आले. यात जानु मट्टामी (शबरी आवास), राजेश मडावी (गोडावून अंतर्गत चेक वाटप), नंदा सयाम (मानव विकास-वाहन), तानुबाई गावडे (श्रावणबाळ पेंशन योजना) राधा तुमरेडी (संजय गांधी निराधार) यांचा समावेश होता.
शासकीय इमारतींचे डिजीटल लोकार्पण
यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, गडचिरोली मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (गुणवंत), मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह चामोर्शी या दोन वसतीगृह व एका शासकीय निवासी शाळा इमारतींचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत 42 खाटांचे पेडियाट्रिक मॉड्युलर आयसीयू, कोविड-१९ कार्यक्रम कृती आराखड्यांतर्गत 50 खाटांच्या मॉड्युलर आयसीयूचेही यावेळी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. पोलीस विभागाच्या मुरूमगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.