मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गडचिरोली, आरमोरी मतदार संघाला झुकते माप

नागरिकांसाठी केली 295 एसटी बसेसची सोय

गडचिरोली : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविल्या जात असलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम शनिवारी गडचिरोलीत मोठ्या जल्लोषात झाला. या कार्यक्रमासाठी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना येता यावे यासाठी प्रशासनाच्या वतीने 295 एसटी बसेसची व्यवस्था केली होती. पण नागरिकांना आणण्यासाठी सदर बसेस पाठविताना गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा मतदार संघाला झुकते माप, तर अहेरी विधानसभा मतदार संघातील गावांना सर्वात कमी बसेस पाठविल्याने काहीसे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नागरिकांना या कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी गडचिरोली विधानसभा मतदार संघातील तालुक्यांमध्ये 140 बसेस, आरमोरी विधानसभा मतदार संघातील तालुक्यांमध्ये 111 बसेस, तर अहेरी मतदार संघातील तालुक्यांमध्ये अवघ्या 44 बसेस पाठविण्यात आल्या. वास्तविक जिल्ह्यात सर्वाधिक दुर्गम भाग अहेरी तालुक्यात आहे. त्यामुळे सर्वात जास्त बसगाड्या याच विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये पाठविणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही.

विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने एसटी बसेस कोणत्याही एका आगारात उपलब्ध होणार नाहीत म्हणून गडचिरोली, ब्रह्मपुरी, अहेरी, चंद्रपूर, राजुरा, वरोरा, चिमूर, नागपूर, उमरेड, भंडारा, पवनी आणि साकोली या आगांमधून बसेस बुक करण्यात आल्या होत्या. त्यापैकी आरमोरी तालुक्यात 40 बस, गडचिरोली तालुक्यात 60, वडसा तालुक्यात 40, कुरखेडा तालुक्यात 30, धानोरा तालुक्यात 30, चामोर्शी तालुक्यात 50, मुलचेरा तालुक्यात 20, अहेरी तालुक्यात 20 तर कोरची 1, सिरोंचा 2, भामरागड 1 आणि एटापल्ली येथे 1 याप्रमाणे बसगाड्या पाठविण्यात आल्या होत्या.