मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह राज्य शासन शनिवारी गडचिरोलीकरांच्या दारी

विविध योजनांच्या लाभासह दाखल्यांचे होणार वाटप

गडचिरोली : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नवे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी (दि. 8 जुलै) गडचिरोलीत येणार आहेत. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्तपणे गडचिरोलीचा दौरा केला होता. शनिवारच्या दौऱ्यात या जोडीच्या सोबतीला अजित पवारही असतील. त्यामुळे तीनही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गडचिरोली शहरालगतच्या कोटगल एमआयडीसीच्या पटांगणावर होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासोबत दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जात आहे.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आतापर्यंत सातारा, कन्नड -औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड- पुणे, जळगांव, नांदेड जिल्ह्यांचा दौरा केला आहे. यातून मिळालेल्या दाखल्यांमुळे नागरिकांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेणे सोयीस्कर झाले आहे. तसेच योजनांची लोकाभिमुखता, पारदर्शकता वाढली आहे.

गडचिरोली जिल्हा राज्यात आघाडीवर
गडचिरोली जिल्हयात आतापर्यंत ग्रामीण भागात झालेल्या शासन आपल्या दारी उपक्रमातून 6 लाख 97 हजार नागरिकांना विविध योजनांचे लाभ तसेच दाखले देण्यात आले आहेत. राज्यात या उपक्रमातून सर्वात जास्त लाभ गडचिरोली जिल्ह्याने दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिली आहे. या जिल्हास्तरावरील कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लाभार्थी सहभागी होणार आहेत. या ठिकाणी हजारो लाभार्थ्यांना योजनांचा लाभही दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 33 योजना व सेवांचा लाभ
नागरिकांना विविध शासकीय दाखले, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, वय व अधिवासाचे दाखले, नॉन क्रिमीलेअर, शेतकरी दाखला, कामगार कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, रेशन कार्ड दुरूस्ती, ग्रामपंचायतीमधील विविध दाखले, नागरिकांचे विविध अभिलेख, मतदार नोंदणी अथवा नाव दुरूस्ती अशा अनेक प्रकारच्या दाखल्यांची किंवा कागदपत्रांची गरज असते. यातील वेगवेगळया 33 योजना, सेवांचा लाभ गडचिरोली जिल्हयात दिला जात आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतून अशा योजना, सेवांसाठीच्या कागदपत्रांचीही एकाच छताखाली पूर्तता करून दिली जात आहे.