खनिज विकास निधीचा वापर गडचिरोली जिल्ह्यातच करावा

आ.डॅा.रामदास आंबटकर यांची अपेक्षा

गडचिरोली : जिल्ह्यातील खनिज संपत्तीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांना चालना मिळून त्यातून रोजगार निर्मितीची संधी निर्माण होत आहे. या खनिजातून मिळणारा महसूल (खनिज विकास निधी) स्थानिक स्तरावर (गडचिरोली जिल्ह्यात) विविध विकास कामांसाठी तातडीने वापरावा, अशी सूचनावजा अपेक्षा विधान परिषदेचे सदस्य, आमदार डॅा.रामदास आंबटकर यांनी व्यक्त केली. येथील प्रेस क्लबमध्ये ‘मिट द प्रेस’ उपक्रमांतर्गत ते प्रेस क्लब सदस्यांसोबत वार्तालाप करत होते.

गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानिमित्त गडचिरोलीत आले असताना त्यांनी प्रेस क्लबला सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपचे धानोरा तालुका प्रभारी अनिल पोहणकर, माजी पं.स.उपसभापती विलास दशमुखे, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष अनिल कुनघाटकर आणि प्रशांत दुरूगवार हे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या आणि करत असलेल्या प्रयत्नांची माहिती आ.डॅा.आंबटकर यांनी दिली. ते म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेपासून आणि तत्पूर्वी नागपूर विद्यापीठाशीही माझा जवळचा संबंध राहिला आहे. गोंडवानाच्या जागेसाठी मीसुद्धा पाठपुरावा केला. या विद्यापीठाला मूर्त रूप देण्यासाठी राष्ट्रपतींचा दौरा आणि मिळालेली जागा हा टप्पा मैलाचा दगड ठरणार आहे. हे विद्यापीठ केवळ औपचारिक शिक्षण देणारे नसावे, तर स्थानिक आदिवासींचे जीवन बदलणारे ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नागपूरची मेट्रो वडसापर्यंत नेण्याची ईच्छा ना.नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ती गडचिरोलीपर्यंत आणा अशी माझी मागणी आहे. मेडीगड्डा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न गंभीर आहे. नुकसानीपोटी त्यांना मदत मिळावी म्हणून मीसुद्धा त्यांचा प्रश्न शासन दरबारी मांडला होता. त्यांना मदत तर मिळाली. पण आता त्या प्रकल्पग्रस्तांच्या दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या जमिनी शासनाने ताब्यात घेऊन जमिनीचा मोबदला द्यावा अशी मागणी शासनाकडे केली आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस त्याबाबत सकारात्मक असल्याचे यावेळी डॅा.आंबटकर म्हणाले.

जिल्ह्याच्या दुर्गम भागात ई-लर्निंगची सुविधा असावी यासाठी काही साहित्याचे वाटप आपल्या वतीने केले आहे. तसेच वाचनालयासाठी पुस्तकेही दिली आहेत. आता ज्या शाळांमध्ये आणि ग्रामपंचायतींमध्ये वीज पुरवठा नाही त्यांना सोलर पॅनल देऊन त्यांची विजेची गरज भागविण्याची मागणी आपण केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोनसरी येथील प्रस्तावित लोह प्रक्रिया प्रकल्पात स्थानिक उमेदवारांना लॅायड्स मेटल्सने प्राधान्य द्यावे. त्यासाठी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षणसुद्धा त्यांनी येथील युवकांना द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.