गडचिरोलीच्या पालकत्वाचा मोह सुटेना, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मला द्या

मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेल? काँग्रेसला शंका

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व घेण्याचा मोह आता मोठ्या नेत्यांना सुटेना झाला आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही जिल्ह्याचे पालकत्व न घेण्याचा पायंडा आहे. पण तो मोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व हवे आहे. आता दोन्ही उपमुख्यमंत्रीद्वय त्यासाठी तयार होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अडीच वर्षांपूर्वी, म्हणजे 2022 मध्ये तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोलीचे पालकत्व होते. पण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी पालकमंत्रीपद सोडले. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरसह गडचिरोली आणि विदर्भातील एकूण पाच जिल्ह्यांचे पालकत्व स्वत:कडे घेतले होते. आता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही ते दुसऱ्या कोणाच्या हाती गडचिरोली जिल्ह्याची सुत्रं देण्यास इच्छुक नाही. बुधवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली ही सुप्त ईच्छा जाहीर केली. अर्थात दोन्ही उपमुख्यमंत्रीद्वय राजी असतील तर आपण ते स्वीकारणार असल्याची पुष्टी त्यांनी जोडली.

गडचिरोलीचे पालकत्व घेणाऱ्यांना मिळते मुख्यमंत्रीपद

2019 पासून सुरूवातीचे अडीच वर्ष एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना अडीच वर्षानंतर त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यांच्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी पालकमंत्रीपद स्वत:कडे घेतल्यानंतर अडीच वर्षांनी त्यांनाही पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होता आले. म्हणजे गडचिरोलीचे पालकत्व घेणाऱ्यांना मुख्यमंत्रीपद मिळते, हा गोड गैरसमज निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने तर गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घेण्यासाठी चढाओढ लागली नाही ना, अशी शंका अनेकांच्या मनात डोकावत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचे पालकत्व घेतल्यास या जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग आणखी प्रशस्त होईल, असेही म्हटले जाते.

‘मालकत्व’ नाही, ‘पालकत्व’ स्वीकारणारे हवे- ब्राह्मणवाडे

राज्याच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीने गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारने ही गोष्ट जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. मात्र गेल्या अडीच वर्षातील अनुभव पाहता फडणवीस यांनी पालकमंत्री म्हणून गडचिरोली जिल्ह्यासाठी पुरेसा वेळ दिलेला नाही. अतिवृष्टीने येणाऱ्या आपत्ती, वाघ आणि हत्तींचा धुमाकूळ, शेतकऱ्यांना होत असलेला अनियमित वीज पुरवठा, रस्ते आणि आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. फडणवीस मात्र दिवाळीच्या सणाला फराळाला येणाऱ्या पाहुण्यासारखे येत होते. त्यांनी येथील जनतेचे प्रश्न समजूनच घेतले नाही, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे. जिल्ह्याचे मालकत्व गाजवणाऱ्या नाही, तर पालकत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्तव्यदक्ष मंत्र्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी, अशी अपेक्षा ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केली.