गडचिरोली : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत आचाहसंहिता भंगाबाबत 18 तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या. चौकशीअंती त्यातील 8 तक्रारींमध्ये तथ्य नसले तरी 10 तक्रारी दखलपात्र होत्या. त्यातील 3 प्रकरणात फौजदारी कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली.
दरम्यान तपासणी पथकाने तीन दिवसांपूर्वी पकडलेल्या दोन वाहनांमधील तीन लाख रुपयांचा हिशेब संबंधित वाहनधारकाने अद्याप संबंधित पथकाकडे सादर केलेला नाही. तसा हिशेब सादर केल्यास आणि तो पटण्यासारखा असल्यास वाहनधारकाला ती रक्कम परत दिली जाणार आहे. मात्र अद्याप त्यासंबंधी कोणीही पुढाकार घेतलेला नाही.
त्या रकमेवर दावा सांगणारे आणि रकमेचा हिशेब देणारे कोणी पुढे आलेले नाही. तसे कोणी पुढे आल्यास आणि समितीने त्यांचा हिशेब ग्राह्य धरल्यास ती रक्कम त्याला परतही करावी लागेल. परंतू तशी वेळ अद्याप आलेली नाही.