‘फिर एक बार, मोदी सरकार’ म्हणत महायुतीने घातली मतदारांना साद

अभिनेत्री रिमीचा गडचिरोलीत रोड शो

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी या तीन नक्षलग्रस्त विधानसभा क्षेत्रात बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जाहीर प्रचाराची मुदत होती. या शेवटच्या दिवशी महायुतीच्या वतीने रॅली काढत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी खुल्या वाहनातून उमेदवार खा.अशोक नेते आणि हिंदी सिनेअभिनेत्री रिमी सेन हे नागरिकांना अभिवादन करत सहभागी झाले होते.

अभिनेत्री रिमी सेन हिने काही अंतरापर्यंत या रोड-शो मध्ये सहभागी होऊन गडचिरोलीकरांना कमळाला मतदान करण्याचे आवाहन केले. भर उन्हातही महायुतीमधील पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महायुतीचे उमेदवार तथा खासदार यांच्या चामोर्शी मार्गावरील प्रचार कार्यालयापासून या रॅलीची सुरूवात करण्यात आली. उन्हाचा पार चढलेला असतानाही मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. खुल्या वाहनावर खा.अशोक नेते यांच्यासह रिमी सेन, माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्यासह भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पदाधिकारी विराजमान होते.

धूम, हंगामा, फिर हेराफेरी अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या रिमीला पाहण्यासाठी गडचिरोलीकर मार्गात उभे होते. ही रॅली ज्या भागातून फिरत होती त्या भागात कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण केली जात होती. रॅलीच्या पुढे फटाके फोडले जात होते. त्यांच्यामागे मोटारसायकल रॅली आणि त्यामागे पायी चालणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असे या रॅलीचे स्वरूप होते. कडक ऊन असतानाही डिजेच्या तालावर उत्साहपूर्ण वातावरणात या रॅलीचा समारोप झाला.

देशात विकासात्मक दृष्टी असलेले सक्षम आणि धाडसी निर्णय घेणारे मोदींच्या नेतृत्वातील सरकार पुन्हा विराजमान करण्यासाठी, या मतदार संघातील नागरिकांचा पुन्हा एकदा मला आशीर्वाद मिळेल, असा विश्वास यावेळी खा.अशोक नेते यांनी व्यक्त केला.