गडचिरोली : महागाई, बेरोजगारी, पेपरफुट प्रकरण, महिला सुरक्षा, खते, बि-बियाण्यांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलिस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था अशा अनेक विषयांवर आक्रमक होऊन जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी भाजप सरकारविरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आले.
इंदिरा गांधी चौकात भाजप सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर चिखलफेक करून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार डॉ.नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजीत कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, अ.जा.सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, महासचिव देवाजी सोनटक्के, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.