देसाईगंजमध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन शिबिर

आवडीच्या क्षेत्रात ध्येय गाठा- आ.गजबे

देसाईगंज : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवार दि.21 जून रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिराचे उद्घाटन आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आवडीचे व इच्छाशक्तीचे क्षेत्र ओळखून त्यानुसार व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाची निवड करून रोजगार व स्वयंरोजगार करावा, असे मार्गदर्शन यावेळी आ.गजबे यांनी केले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे, विशेष अतिथी म्हणून ए.ए. एनर्जी लि. वडसाचे व्यवस्थापक आफताब आलम खान, सुभाष इंजिनिअरिंगचे मुरलीधरजी सुंदरकर, प्राचार्य दामोधर शिंगाडे, प्रा.संजय कुथे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्यात दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधी, व्यक्तिमत्व विकास व मुलाखतीचे तंत्र, आयटीआय तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, उच्च शिक्षणाच्या संधी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. रोजगार आणि स्वयंरोजगार तथा शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्जांच्या विविध योजनेविषयी स्टेट बँकेचे फिल्ड ऑफिसर अनुराग बोरकर यांनी मार्गदर्शन केले. आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सैन्य दलामध्ये नोकरीच्या विविध संधी व पोलिस भरती, अग्निवीर योजनेविषयी पो.उपनिरीक्षक कोमल माने यांनी माहिती दिली.

या शिबिराचा आरमोरी विधानसभा क्षेत्रातील 450 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. सदर कार्यक्रम संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. प्रास्ताविक रासेयो समन्वयक सी.एम. गरमळे यांनी तर आभार प्रदर्शन सहसमन्वयक व्ही.वाय. नागमोती यांनी केले. कार्यक्रमाकरिता गटनिदेशक आर.एम. गोतमारे, एम.एस. जाधव, मुख्य लिपिक जी.आर. वांढरे, शिल्प निदेशक ए.व्ही. भोले, सी.डी. समर्थ, के.एस. उमक, आर.बी. भोयर, टी.यु. सोयाम, डी.सी. बोकडे, बी.बी. घरडे, एम.सी. चौदंते, आर.वाय. कऱ्हाडे एस.एस. प्रधान, एन.डी. भडके यांनी सहकार्य केले.