गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या गडचिरोली-चिमूर क्षेत्रात आता रणधुमाळी वाढली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या एका सभेसाठी अ.भा.काँग्रेस कमिटीचे महासचिव खा.मुकूल वासनिक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आरमोरीत येत आहेत.
महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी ना.नितीन गडकरी यांची पहिली सभा सकाळी १० वाजता देसाईगंज (वडसा) येथील तालुका क्रीडा संकुलात होणार आहे, तर दुसरी सभा दुपारी १ वाजता चामोर्शीतील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. दुसरीकडे महाविकास आगाडीचे डॅा.नामदेव किरसान यांच्यासाठी आरमोरी येथील नवीन बसस्थानकाजवळच्या मैदानावर दुपारी २ वाजता महाविकास आघाडीची प्रचार सभा होणार आहे.
कोण कोणावर काय-काय आरोप-प्रत्यारोप करतात, आपल्याच उमेदवाराला का निवडून द्यायचे हे कशा पद्धतीने पटवून देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात कसे यशस्वी होतात, हे पाहणे मजेशिर असणार आहे.