पळसगावच्या महादेव पहाडीवर लुटमार, गोंदिया जिल्ह्यातील दोन तरुणांना अटक

देसाईगंज पोलिसांची तातडीने कारवाई

गडचिरोली : जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या अरततोंडी-पळसगावच्या महादेव पहाडीवर दर्शनासाठी गेलेल्या दोन भाविकांना धमकावून जबरीने खिशातून रोख रक्कम आणि मोबाईल पळविणाऱ्या दोन सरकार तरुणांना देसाईगंज पोलिसांनी समयसुचकता दाखवत तातडीने कारवाई करून अटक केली. त्यांना तीन दिवसांचा पीसीआर देण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, देसाईगंजचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या आदेशानुसार सपोनि संदीप आगरकर आणि त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत असताना, महादेव पहाडीवर लुटमारीची घटना झाल्याची माहिती प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनिय बातमीदारांनी दिली. त्या आधारावर पेट्रोलिंगवर असलेल्या सपोनि आगरकर यांच्या नेतृत्वातील पथकाला तिकडे पाठविले. त्यांनी तिकडे मोर्चा वळविला असता फिर्यादी जय सहदेव दोनाडकर रा.बरडकिन्ही, ता.ब्राम्हपुरी, जि.चंद्रपूर यांनी सांगितले की, जय व त्यांचा मित्र हर्षल पहाडी चढत असताना हर्षल याला दम आल्याने तो थोडा वेळ थांबला होता. याचवेळी दोन अनोळखी पगडीधारक सरदार हर्षलजवळ आले. त्यांनी हर्षल आणि जय यांना मारण्याची धमकी देऊन जवळ असलेले पैसे आम्हाला द्या, असे धमकावले. पण जय याने नकार दर्शविल्याने त्यापैकी एका मजबूत बांधा असलेल्या इसमाने त्याची कॉलर पकडून मारून टाकीन, अशी धमकी देऊन खिशात हात टाकला. खिशालील पॉकीटमध्ये असलेले 950 रुपये आणि हर्षलकडे असलेला एक मोबाईल (किंमत 13 हजार 500 रुपये) बळजबरीने हिसकावले. त्यानंतर तिथे काही लोक मदतीला येत असल्याचे पाहून ते दोन्ही इसम पैसे व मोबाईल घेऊन पहाडीवर पळून गेले.

पोलिसांनी ही हकिकत एेकताच सपोनि आगरकर आणि त्यांच्या स्टाफने महादेव पहाडीवरील झुडूपी जंगलात शोध घेतला असता, दोन अनोळखी इसमांनी त्यांना पाहताच पळ काढला. पण पोलिस पथकाने अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

लुटमार करणाऱ्या त्या दोन युवकांमध्ये बादलसिंग नैतरसिंग टाक (32 वर्ष), अनमोलसिंग निर्मलसिंग टाक (28 वर्ष) दोघेही रा.अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया यांचा समावेश आहे. त्यांनी लुटलेले पैसे आणि मोबाईल मिळून 14,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध देसाईगंज पोलिसांनी भादंवि कलम 392, 34 अन्यये गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, तसेच कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अजय जगताप, सपोनि संदीप आगरकर, अंमलदार विलेश ढोके, शैलेश तोरपकवार यांनी केली.