काँग्रेसच्या दाव्याने मित्रपक्षांना मिळणार का डच्चू? विधानसभा निवडणुकीचे वारे

लोकसभेतील यशाने काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता महाविकास आघाडीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. आघाडीतील तीन पक्षांपैकी काँग्रेसमध्ये ईच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यांचा उत्साह पाहता जिल्ह्यातील तीनही विधानसभेच्या जागा काँग्रेस पक्षानेच लढवाव्यात, असा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार असल्याचे काँग्रेसचे नेते आणि गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक आ.अभिजित वंजारी यांनी येथे पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रत्यक्षात तसे झाल्यास महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षांच्या वाट्याला एकही जागा मिळणार नाही.

गुरूवारी आ.वंजारी यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभेसाठी ईच्छुक उमेदवारांसह सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी खा.डॅा.नामदेव किरसान, माजी खा.मारोतराव कोवासे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आ.आनंदराव गेडाम, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

केवळ काँग्रेसलाच जागा मिळाव्यात हा उद्देश नसून निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन आम्ही काँग्रेससाठी तीनही जागा मागत आहोत, असे खा.किरसान यांनी यावेळी स्पष्ट केले. वास्तविक आरमोरी विधानसभा क्षेत्रासाठी शिवसेनेचे पदाधिकारी ईच्छुक आहेत. यापूर्वी या क्षेत्रातून शिवसेनेला विजय मिळाला असल्याने पुन्हा या क्षेत्रात शिवसेना पदाधिकारी आपले नशिब आजमावू ईच्छितात. दुसरीकडे अहेरी क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) एका सशक्त उमेदवाराला गळाला लावून उमेदवारी देण्यासाठी ईच्छुक असल्याचे बोलले जाते. पण काँग्रेसचा दावा पाहता महाविकास आघाडीतील इतर दोन्ही पक्षांना आपल्या मनसुब्यांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.