अहेरी : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गुरुवारी (दि.18) अहेरी तहसील कार्यालयात विकासात्मक कामांची आढावा बैठक घेतली. यावेळी अहेरी तालुक्यातील व शहरातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, वनजमिनीवरील पट्टे या व अन्य विषयांवर मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करून चांगलेच धारेवर धरले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ना.धर्मरावबाबा आत्राम, तर मंचावर प्रामुख्याने अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी आदित्य जिवणे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तहसीलदार बालाजी सोमवंशी, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, अहेरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नानाजी दाते, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
अहेरी शहरातील अहेरी ते आलापल्ली रस्त्यावरील पोलीस उपमुख्यालय प्राणहिता ते मुख्य चौकातील रस्त्याच्या कामात मागील सहा महिन्यांपासून दिरंगाई होत असल्याचा विषय सुरेंद्र अलोने यांनी छेडला. त्यावर मंत्री धर्मरावबाबा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत संबंधित कंत्राटदारावर कारवाई व प्रसंगी कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टेड करण्याचे सूचित केले. याशिवाय वीज, रस्ते, बसेस, वन जमिनीचे पट्टे, कृषी, शिक्षण, सिंचन, आरोग्य, पोषण आहार आदी विषयांकडे लक्ष वेधून नागरिकांना सुलभतेने सोयीसुविधा पुरविण्याचे, कामात दर्जेदारपणा ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच त्यात दिरंगाई व दुर्लक्षपणा झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत कठोर पाऊले उचलले जाईल, असे संकेत दिले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी माता भगिनींचे अर्ज ताबडतोब व अचूक भरून विविध योजनांचे लाभ देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
या आढावा बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, अरुण मुक्कावार, श्रीकांत मद्दीवार, इरफान पठाण, नगरसेवक श्रीनिवास चटारे, अमोल मुक्कावार, शैलेश पटवर्धन, उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, स्वप्नील श्रीरामवार, महेश बाक्केवार, बाबुराव तोरेम, राहुल दुर्गे, रमेश कस्तूरवार यांच्या अनेक नागरिक उपस्थित होते.
वृक्षारोपण व शेतकऱ्यांचा सत्कार
यावेळी तहसील कार्यालय परिसरात ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते विविध फळे व फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.तसेच वडलापेठ इथे स्थापित होत असलेल्या लोहप्रकल्पाला चालना मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी कंपनीला जमीन उपलब्ध करून दिल्याने त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.