काँग्रेस देणार निवडणुकीत महिला आणि तरुणांना संधी

जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार

जिल्हा बैठकीसाठी विश्राम भवनात जमलेले जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी

गडचिरोली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशानंतर जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा हुरूप वाढला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता सुद्धा स्थापन करण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच आगामी निवडणुकांमध्ये आणि पक्ष संघटनेत युवा वर्ग आणि महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याच्या मुद्द्यावरही सकारात्मक चर्चा करण्यात आली.

माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या अध्यक्षतेखाली विश्राम भवनात झालेल्या या बैठकीत सुरूवातीला कर्नाटक विजयाचा अभिनंदन प्रस्ताव काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि संपूर्ण काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या नावे पारित करण्यात आला.

यावेळी देशात वाढत चाललेली महागाई, गॅस, पेट्रोल, डिझेल, कृषी अवजारे, बी-बियाणे यांचे दर आणि बेरोजगारी आटोक्यात आणण्यात केंद्र सरकार असमर्थ ठरत असल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी सरकारला लक्ष्य केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. जिल्ह्यातील कोनसरी प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही, सुरजागड येथील कच्चा माल जिल्हा आणि राज्याबाहेर विकल्या जात आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प प्रलंबित आहेत. उपमुख्यमंत्र्यांकडेच ऊर्जा खाते असताना देखील आणि जिल्ह्यात कोणता मोठा उद्योग नसतानाही लोडशेडिंग करून शेतकऱ्यांची वीजही कपात केली जात आहे. अशा अनेक समस्या जिल्ह्याला भेडसावत असताना भाजपचे खासदार-आमदार यावर बोलत नसल्याचा आरो्प काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.

बैठकीला जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्ह्याचे प्रभारी डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, पंकज गुड्डेवार, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष जेसा मोटवानी, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी जि.प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, महिला काँग्रेस अध्यक्ष अॅड. कविता मोहरकर, निराश्रित विकास विभाग प्रदेश सचिव कुसुम आलाम, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, रोजगार सेलचे अध्यक्ष दामदेव मंडलवार, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, अनुसूचीत सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, परीवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, आदिवासी काँग्रेस अध्यक्ष छगन शेडमाके, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

ओबीसी समाजाची दिशाभूल
जिल्ह्यातील ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेत पूर्ववत आरक्षण लागू करणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते, मात्र सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण होत असताना या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय सरकारने घेतलेला नाही ही जिल्ह्यातील ओबीसी समाजाची दिशाभूल आहे. आता हाच संदेश घेऊन प्रत्येक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे, अशी सूचना यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली.