गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड खाणीतील लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे अपघात वाढल्याचे म्हटले जात आहे. या अपघातांसाठी नेमके कोण जबाबदारी आहेत? अपघात टाळण्यासाठी या ट्रकांची वाहतूक बंद ठेवणे गरजेचे आहे का, की वाहतुकीचे नियम आणि शिस्त पाळण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करणे जास्त महत्वाचे आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
गेल्या 30 एप्रिल रोजी गडचिरोलीजवळच्या मुरखळा (नवेगाव) येथे एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात लोहखनिजाचा ट्रक रस्त्याच्या बाजुला असलेल्या शहीद स्मारकाला धडकला. यात दोघांना जीव गमवावा लागला तर एक जण जखमी झाला. या घटनेत लोहखनिज भरलेल्या ट्रकसमोर अचानक आलेल्या दुचाकीस्वारामुळे चालकाला वाहन नियंत्रित करणे शक्य झाले नाही आणि हा अपघात घडला, अशी नोंद पोलिसांनी घेतली. दुसऱ्या घटनेत 14 मे रोजी आपल्या मामासोबत दुचाकीवरुन गोंडपिंपरीकडे जात असलेल्या 12 वर्षीय सोनाक्षी मसराम या मुलीला ट्रकने चिरडले. रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने खडी, मुरूमावरून मामाची दुचाकी स्लिप झाली आणि सोनाक्षी ट्रकच्या मागील चाकात आली. या घटनेत ट्रक चालकाचा दोष किती होता हे न्यायालय ठरवणार असले तरी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या घटनेत दि.20 मे रोजी वासुदेव कुळमेथे या शिक्षकाला जीव गमवावा लागला. ट्रकने चिरडण्याअगोदर कुळमेथे यांच्या बाईकची एका स्कुटीला धडक बसली. त्यामुळे बॅलन्स जाऊन ते ट्रकच्या दिशेने पडले आणि ट्रकखाली आले.
वाहतुकीच्या नियमांचे पालन केव्हापासून करणार?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील तीनही अपघातातील एकाही दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले नव्हते. एकीकडे जड ट्रकची वाहतूक वाढली आहे. अशा स्थितीत वाहतुकीचा नियम म्हणूनच नाही तर स्वतःच्या जीवाची काळजी म्हणूनही दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याची गरज वाटत नाही, याबद्दल परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आतापर्यंत उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात जड वाहनांची वाहतूक नव्हती. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांबाबत वाहन चालकच नाही तर संबंधित अधिकारी वर्गही फारसे गंभीर राहात नव्हते. परंतू आता या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रक पोलिसांनीही अधिक सक्रिय होऊन जड वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या फिटनेससोबत वाहनचालकांच्या फिजिकल फिटनेसचीही तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत सातत्याने करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.